केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ७० सीपी इंडेक्सवरील प्रदूषण अतिशय धोकादायक ठरविले आहे. प्रदूषणात देशात चौथ्या व सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या चंद्रपूरचे सर्वसमावेशक पर्यावरण मूल्यांकन ५४.४२ सीपी इंडेक्सवर आणण्यात स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला यश आले आहे. तरीही महाऔष्णिक वीज केंद्र, कोळसा खाणी आणि सिमेंट व इतर उद्योगांमुळे चंद्रपुरात हवा, जल, ध्वनी आणि धुळीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हय़ात वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या ३० कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र, खासगी औष्णिक विद्युत केंद्र, बल्लारपूर पेपर मिल, पोलाद उद्योग, पाच सिमेंट कारखाने तसेच वाहतूक व्यवसाय व प्रदूषणात भर घालणारे असंख्य उद्योग आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार कुठल्याही शहराचा सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक हा ७० सीपी इंडेक्सच्या वर नको. तो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानीकारक समजला जातो. मात्र २०१० च्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार चंद्रपूरचा सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक तेव्हा ८३.९८ होता. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर देशात प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर होते. प्रदूषणाची ही आकडेवारी बघून तेव्हा खासदार हंसराज अहीर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे आणले होते. त्यानंतरच चंद्रपूरचा आराखडा तयार करण्यात आला. तो अतिशय कठोरपणे राबविण्यात आला. २०१३ मध्ये पुन्हा एकदा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वसमावेशक मूल्यांकन केले असता चंद्रपूरचा सीपी इंडेक्स ८१.९३ होता. यावेळी चंद्रपूर चौथ्या वरून देशात सहाव्या क्रमांकावर आले होते. प्रदूषणाची ही मात्रा कमी करण्यासाठी कठोर उपाय योजना करताना सर्वाधिक प्रदूषण करणारे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे २१० मेगाव्ॉटचे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचा दोन संच बंद करण्यात आले. विविध उपाययोजना करतानाच महाऔष्णिक विद्युत केंद्र तसेच वेकोलि, बिल्ट तसेच इतर उद्योगांतून नदी, नाले व तलावांत सोडण्यात येणारे विषारी पाणी सोडणे बंद करण्यात आले. त्याचा परिणाम जलप्रदूषणही कमी झाले. विशेष म्हणजे यानंतर २०१० पासून या जिल्हय़ात केंद्रीय प्रदूषण मंडळाले लावलेली उद्योगबंदी मागे घेण्यात आली. केंद्रीयमंत्री हंसराज अहीर व अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे तसेच प्रदूषण कमी झाल्याने ही बंदी मागे घेण्यात आली. प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर शहराचे सर्वसमावेशक पर्यावरण मूल्यांकन ५४.४२ सीपी इंडेक्स आहे. याचाच अर्थ शहरातील प्रदूषण कमी झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution in chandrapur
First published on: 12-11-2016 at 01:37 IST