पूजा चव्हाण प्रकरणावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. संजय राठोड बलात्कारी असून, एका बलात्काऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्याभिचाराचं उदात्तीकरण सुरू आहे. पण, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं,” असं म्हणत वाघ यांनी राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांची नाशिक येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकार आणि पोलिसांना काही सवाल उपस्थित केले. “पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोडांचे ४५ मिस्ड कॉल आले आहे. तो मोबाईल पोलिसांकडे आहे. त्याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही. याप्रकरणात आपल्याला फक्त अंदाज बांधायचे आहेत. कारण मराहाष्ट्रातील जनतेला काहीही माहिती नाही की, पूजा चव्हाण प्रकरणात नेमकं काय झालं आहे? अरुण राठोडने पूजाच्या मृत्यूच्या दिवशी १०० या नंबरवर कॉल करुन सर्व कबुली दिली होती. ‘यात माझा कुठलाही हात नाही. हे सर्व संजय राठोड यांच्यामुळे,’ असं त्याने सागितलं. त्यानंतर त्याला समोरच्या कंट्रोल रुमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने एक नंबर दिला. तो ९१४६८७०१०० हा नंबर, त्यांनी त्याला दिला. या नंबरवर कॉल करायला सांगितलं. या नंबरवर सकाळी ८.४० मिनिटांनी फोन गेला. मग अरुण राठोडने पुन्हा सर्व कबुली या क्रमांकावरील व्यक्तीला दिली. त्यानंतर अरुणला थांबवण्यात आलं, त्यानंतर या क्रमांकावरुन तिसऱ्या व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर घेतलं. त्या कॉलवर पुन्हा एकदा सर्व सांगण्यात आली, आता ते दोन व्यक्ती कोण होते?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
“ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोडचा आहे, हे शेंबडं पोरगंही सांगेल. तरीही काहीही कारवाई झाली नाही. तक्रार नाही. कोण आहे यांचा बाप हे सर्व करवून घेणारा? मी याआधी या तिन्ही पक्षाची एकी कुठेही पाहिली नाही. एकी कुठे झाली, तर बलात्काऱ्याला वाचवण्यात झाली. एकाने खुर्ची वाचवली, दुसरा त्याच मार्गावर चालला आहे. धनंजय मुंडे प्रकरणी आम्ही (भाजपा) तोंडघाशी पडलो आहोत असं म्हणण्यात आलं. मग का रेणू शर्मावर गुन्हा दाखल केला नाहीत? सरकार तुमचं, पोलीस तुमचे. गुन्हा दाखल करायची हिम्मत दाखवा. मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी बसला आहे. षंढासारखं बसून राहणार हे सरकार नामर्द आहे. पण मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा आहे. मला अपेक्षा आहेत. आम्ही सातत्याने बोलतोय पण, साधा एफआयआर होत नाही. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं खुर्चीत बसल्यावर एवढी वाईट परिस्थिती होते का? आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.