जात आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंबीयांचा आठ कंपन्यांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यातील पाच कंपन्या खेडकर यांचे पालक, दिलीप आणि मनोरमा यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यावसायिक पत्त्यावरून चालवल्या जात आहेत. एकूण, आठपैकी सात कंपन्या डिलिजेन्स ग्रुपच्या छत्राखाली स्थापन केल्या आहेत. तर आठवी म्हणजे पूजा ऑटोमोबाईल्स ही एक फर्म असू यामध्ये मनोरमा तिच्या भावाबरोबर भागीदार आहे.

डिलिजन्स कंपन्यांमध्ये थर्मोवेरिटा इंजिनिअरिंगचा समावेश आहे. या कंपनीच्या नावे दोन अलिशान गाड्याआहेत. या कंपनीच्या शेअरहोल्डर्समध्ये लता बांगर यांचा समावेश आहे. लता बांगर या दिलीप खेडकर यांची बहीण असून महादेव बांगरसुद्धा या कंपनीचे शेअरधारक आहेत. पुण्यातील तळवडे येथील व्यावसायिक भूखंड मनोरमा खेडकर यांच्या नावे असून पूजाने हाच पत्ता रेशन कार्डमध्ये नमूद केला आहे. हे रेशन कार्ड त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्याकरता दिल होतं. इतर डिलिजेन्स कंपन्यांमध्ये दोन “साखर आणि कृषी” कंपन्या समाविष्ट आहेत, त्या सर्वांमध्ये खेडकर किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्याशी जोडलेले इतर संचालक किंवा भागधारक म्हणून सूचीबद्ध आहेत.

हेही वाचा >> पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी

इंडियन एक्स्प्रेसने डिलिजेन्स ग्रुपच्या कंपन्या आणि ऑटोमोबाईल फर्मशी संबंधित रेकॉर्डचा तपास केला आणि खेडकरांच्या काही प्रमुख नातेवाईकांशी आणि या व्यावसायिक संस्थांमधील नाव असलेल्या इतरांशी संपर्क साधल्यावर काही माहिती मिळाली आहे.

पूजा खेडकर आणि मनोरमा खेडकर अनेक कंपन्यांमध्ये भागीदार

डिलिजेन्स ग्रुपच्या कंपन्यांपैकी डिलिजेन्स इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये पूजा खेडकर यांनी २०१८ मध्ये २० टक्के हिस्सा घेतला होता. तिचा भाऊ पियुष २०२२ मध्ये ओम दीप शुगर अँड ऍग्रोमध्ये ५० टक्के स्टेक होता. तर, डिलिजेन्स शुगर अँड ॲग्रो, डिलिजेन्स (इंडिया) कॉर्पोरेशन आणि डिलिजेन्स इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपन्यांमध्ये मनोरमा खेडकर २०१८ पर्यंत भागधारक होत्या. महत्त्वाचं म्हणजे ओम दीप शुगर अँड ॲग्रो वगळता इतर सहा डिलिजेन्स ग्रुप कंपनीने २०१९ नंतर वार्षिक रिटर्न भरलेले नाहीत.

पूजा खेडकर यांच्या आत्येच्या पतीचंही नाव समोर

दिलीप यांच्या बहिणीचा पती महादेव बांगर हे चार डिलिजेन्स कंपन्यांशी रेकॉर्डमध्ये जोडलेले आहेत. महादेव हे महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये मनोरमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या पूजा ऑटोमोबाईल्स या ट्रॅक्टर डीलरशिपमध्ये देखील भागीदार आहेत. इंडियन एक्स्प्रेसशी फोनवर बोलताना महादेव यांनी दावा केला की या कंपन्यांच्या कामकाजात त्यांचा सहभाग नाही. “आम्ही भागीदार आहोत पण कंपन्या आता बंद झाल्या आहेत. त्यात इतर लोकही सामील होते. मला या व्यवसायांची फारशी कल्पना नाही. खेडकर हे आमचे नातेवाईक आहेत. लता ही दिलीप खेडकर यांची बहीण आहे”, असं ते म्हणाले.

पूजा खेडकर यांच्या मावस भावाच्या नावेही शेअर्स

पूजाचा मावस भाऊ संचित हांगे हा चार डिलिजेन्स कंपन्यांशी जोडलेला आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील त्यांच्या कौटुंबिक मालकीच्या शेतात संचितचे वडील तानाजीराव हांगे यांनी स्वत:ची ओळख शेतकरी आणि काँग्रेसचे माजी तालुका पदाधिकारी म्हणून केली. त्यांचा मुलगा संचालक असलेल्या कंपनीच्या मालकीच्या गाड्या खेडकर का वापरत आहेत? असे विचारले असता तानाजीराव म्हणाले, “तो (संचीत) व्यवसायाने शेतकरी आहे आणि कंपन्यांमधील त्याच्या सहभागाबद्दल मला फारशी माहिती नाही. पूजाची आई मनोरमा माझ्या पत्नीची धाकटी बहीण आहे. संचित प्रवास करत असल्याने संपर्क होऊ शकला नाही”, असा दावाही तानाजीराव यांनी केला.

सहज ओळख असलेल्या नातेवाईकांच्या नावेही शेअर्स

कविता बेंडाळे अशी ओळख असलेल्या महिलेचं नाव थर्मोवेरिटासह पाच डिलिजेन्स कंपन्यांमध्ये आहेत. यामध्ये त्यांचा मुलगा आकाश याचंही नाव आहे. इंडियन एक्स्प्रेसने बेंडाळे यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट दिली तेव्हा त्यांनी खेडकर हे फक्त ओळखीचे असल्याचं सांगितलं. “आम्ही साधी, मध्यमवर्गीय लोक आहोत. आम्हाला कंपन्यांबद्दल माहिती आहे परंतु त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल किंवा आर्थिक गोष्टींबद्दल कोणतीही कल्पना नाही. खेडकरांना आम्ही अगदीच सहज ओळखतो. आमची नावे (कंपन्यांमध्ये) आहेत कारण त्यांनी (खेडकरांनी) आम्हाला विनंती केली होती”, असं कविता बेंडाळे यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कविता यांचा मुलगा आकाश हा ओम दीप शुगर अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये शेअरहोल्डर आहे. ही कंपनी पुण्यातील सदानंद अपार्टमेंटमधील मनोरमा यांच्या मालकीच्या व्यावसायिक मालमत्तेवर नोंदणीकृत आहे. या पत्त्यावर इतर दोन डिलिजन्स कंपन्याही नोंदणीकृत होत्या. पुण्यातील चंद्रलोक अपार्टमेंटमधील मनोरमा यांच्या मालकीच्या दुकानाचा पत्ता चौथ्या डिलिजेन्स कंपनीने वापरला.