मान्सूनचे आगमन 15 जून रोजी कोकणात झाले असले तरी अद्यापि मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. 22 ते 25 जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाची शक्यता आणि प्रमाण कमी राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

26 तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड पडणार असून तो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. तसेच 26 जूननंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसाच्यादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन देखील हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोलीत शनिवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा लागलेली होती. गेल्या १७ दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट सगळेचजण बघत आहेत. मराठवाड्याला दुष्काळाचे सर्वाधिक चटके बसल्याने या भागातले शेतकरीही पावसाची वाट बघत होते आणि अखेर वरूणराजाने बरसण्यास सुरूवात केलेली आहे. तसेच पावसामुळे वातावरणातला उकाडा दूर झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of windy rain in state between 22 to 26 june says weather expert jud
First published on: 22-06-2019 at 10:25 IST