गडचिरोलीत फलकयुद्ध रंगले!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोलीत नक्षलवादी, ग्रामस्थ व पोलिस यांच्यात फलकयुध्द रंगले असतानाच शुक्रवारी अतिसंवेदनशील भागातील कुरूमपल्लीच्या ग्रामस्थांनी बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करून नक्षलवादाला स्पष्टपणे विरोध दर्शविला आहे. काही गावात नक्षलवाद्यांच्या विरोधात पत्रके मिळाली असून अहेरी-सिरोंचा मार्गावरील जिमलगट्टा येथे नक्षलवादाचा विरोध करणारे चार कापडी फलक झळकत आहेत.

गडचिरोलीत नक्षलवादी, ग्रामस्थ व पोलिस यांच्यात फलकयुध्द चांगलेच रंगले आहे. काल नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य गावात ठिकठिकाणी भित्तीपत्रके व फलक लावून २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन स्थानिक आदिवासींना केले आहे. सिरोंचा-अहेरी मार्गावरील जिमलगट्टा येथे नक्षलवादाचा विरोध करणारे फलक  लावण्यात आले आहेत. जय सेवा आदिवासी कमिटी व आदिवासी बचाव समिती असा उल्लेख या फलकांवर असून हिंसाचार करून नक्षल्यांनी आदिवासींवर अत्याचार केले. विकासापासून दूर ठेवले. जल, जंगल जमिनीच्या नावावर नक्षली गोरगरीब आदिवासींची फसवणूक करीत आहेत. तेव्हा नक्षल्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, २६ जुलैपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू होत असतांना अतिसंवेदनशील कुरूमपल्ली गावात ग्रामस्थांनी बंदुका पोलिसांच्या सुपूर्द करून नक्षलवाद्यांना विरोध असल्याचे दाखवून दिले आहे. जिल्हय़ातील अहेरी तालुक्यातील नक्षलवादाने प्रभावित असलेल्या उपपोलिस ठाणे दामरंचा येथे   शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक राजा रामासामी, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दामरंचाचे प्रभारी अधिकारी अनिल लवटे, पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोसले, गणेश मोरे व सर्व कर्मचाऱ्यांनी दामरंचा हद्दीतील जनतेला नक्षल सप्ताहाला विरोध करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कुरूमपल्ली गावातील ग्रामस्थांमध्ये नक्षलवाद्यांविषयीचा तीव्र रोष बघायला मिळाला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या जवळ असलेल्या सर्व बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या. गेल्या कित्येक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळेच आमच्या गावात सरपंच नसल्याने येत असलेल्या अडचणीबाबत गावक ऱ्यांनी रोष व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Posters against naxals in gadchiroli
First published on: 22-07-2017 at 02:40 IST