मीरा-भाईंदरच्या मुख्य मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना वाट मिळणे अवघड झाले आहे. त्याचप्रकारे दुचाकी वाहनाचे अपघात वाढले असल्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याकरिता पालिका प्रशासन कोटय़वधी रुपये खर्च करते. परंतु कामात करण्यात येणाऱ्या हलगर्जीपणामुळे हे खड्डे योग्य पद्धतीने बुजवले जात नाही. तसेच सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात खड्डे बुजवण्याचे कामेच झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रामुख्याने मीरा रोड स्थानकाबाहेरील परिसर, घोडबंदर मार्ग आणि मीरा-भाईंदर मुख्य मार्गावर खड्डे अधिक आहेत. धक्कदायक बाब म्हणजे या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची रहदारी असल्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य मार्गावरील हा रस्ता मीरारोड व भाईंदरला जाणारा रस्ता असून या रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. काशिमीरा, प्लेझेंट पार्क, हाटकेश, सिल्व्हर पार्क,  बेव्हरली पार्क, शिवार गार्डन, दीपक रुग्णालय, गोल्डन नेस्ट फाटक रोड या भागात मोठमोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना खड्डय़ातून वाहने चालवताना मोठा त्रास होत आहे.

गणरायाच्या आगमनाचा मार्ग खडतर

करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. परंतु शहरातील खड्डय़ांची परिस्थिती पाहता घरगुती गणपती देखील आणण्याकरिता मोठी कसरत करावी लागण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मेट्रो रेल्वेचे काम सुरू होते तसेच मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे खड्डे बुजवता आले नव्हते. आता मात्र रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग )

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on the main road of mira bhayander city abn
First published on: 21-08-2020 at 00:01 IST