कोल्हापूर : इटलीतील ‘प्राडा’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कोल्हापुरात चप्पल निर्मिती करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. प्राडाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आता त्यांच्याशी निर्माण झालेला वाद कमी होऊन सौहार्दाचे नवे पाऊल पडताना दिसत आहे.
मिलान येथे झालेल्या फॅशन शोमध्ये वापरण्यात आलेल्या पादत्राणावरून वाद झाला होता. ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावरून टीका टिप्पणी झाली होती. त्यावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी
‘प्राडा’ कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. या कंपनीने कोल्हापुरात येऊन कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार आज ‘प्राडा’ कंपनीच्या पुरुष विभागाचे तांत्रिक संचालक प्रालावो तीव्रोन, डॅनियल कोंडू, आंद्रिया पोलिस्त्रेली, रॉबर्ट पोलोस्ट्रेली आदींचे शिष्टमंडळ कोल्हापुरात आले होते. सुभाषनगर या भागामध्ये चप्पल निर्मिती करणाऱ्या कारागिरांची वस्ती आहे. त्या ठिकाणी जाऊन या शिष्टमंडळाने चप्पल निर्मितीची सविस्तर पाहणी केली.
चप्पल निर्मितीसाठी चामडे कसे कमावले जाते, त्याचे वेगवेगळे भाग कसे बनवले जातात, त्यावर कलाकुसर कशी केली जाते, चप्पल निर्मितीसाठी कुटुंबातील सदस्य कशाप्रकारे मदत करतात आदी सर्व बाबी त्यांनी कारागिरांशी संवाद साधून समजावून घेतल्या.
कोल्हापुरी चप्पल परिधान करून तिचा वापरातील प्रत्यक्ष अनुभव घेतला. यानंतर त्यांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे जाऊन चप्पल निर्मितीच्या व्यवसायाबाबत माहिती घेतली. कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणण्याच्या दिशेने कसे नियोजन करता येईल, याबाबत प्रयत्नशील राहण्याचे संकेत शिष्टमंडळाने दिले.