Praful Patel on Ajit Pawar Meets Amit Shah at Delhi : नुकताच बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत बिहारमध्ये नीतीश-मोदी-चिराग (बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तथा लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान) यांच्या एनडीएची त्सुनामी पाहायला मिळाली. एनडीएने बिहारमधील २४३ पैकी २०३ जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभर या विजयाचा जल्लोष केला. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवार यांनी या भेटीचा एक फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत म्हटलं की “बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अमित शाह यांचं अभिनंदन केलं.”
अमित शाह यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील जमिनीच्या खरेदीच्या व्यवहारामुळे अडचणीत आलेले असताना ही भेट झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना या प्रकरणातून वाचवण्यासाठी अजित पवार यांनी ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. या जमीन व्यवहाराप्रकरणी नेमेल्या चौकशी समितीचा अहवाल लवकरच येणार आहे. त्यामुळे पार्थ व अजित पवार समर्थकांची धाकधुक वाढली आहे.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने अजित पवार व अमित शाह भेटीने सर्वांच लक्ष वेधलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत अजित पवारांचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे.
अजित पवार व अमित शाह भेटीचं कारण काय?
प्रफुल्ल पटेल यांनी काही वेळापूर्वी गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अजित पवार हे काल (१५ नोव्हेंबर) महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. त्याच्या आधी बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामुळे अभिनंदन करण्यासाठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. यात दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही, याविषयी मी माहिती घेतली आहे. पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली आहे. याबाबत पोलीसही चौकशी करत आहेत. याबाबतीत जे काही तथ्य आढळतील त्यानुसार कारवाई केली जाईल.
