राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या समर्थकांना एकत्र करत भाजपाशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनच दिवसांनी (आज, ५ जुलै) अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीवेळी अजित पवार यांनी बडखोरीसह अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच यावेळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनीही अनेक मुद्दे मांडले.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, तुम्ही सर्वांनी पाहिलंय, या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलंय, शरद पवार जिथे जिथे प्रफुल पटेल तिथे तिथे. हे चित्र नेहमी तुम्ही पाहिलं असेल. प्रफुल्ल पटेल म्हणजे पवार साहेबांची सावली असं होतं की नाही? म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी या मंचावर उभा आहे. दादा (अजित पवार) आणि सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर मी उभा आहे. माझा त्यांना पाठिंबा आहे. त्यामागे असणारा इशारा तुम्हाला समजला पाहिजे. मी या मंचावरून महाराष्ट्राला आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, अजूनही वेळ गेलेली नाही.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी विनंती करतो, मी हात जोडून, पाय जोडून त्यांना (शरद पवार) विनंती करतो. पवार साहेब आमचं दैवत आहेत. आमची पण भावना तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. आपला हा एक मोठा राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आहे. तुमच्या आशीर्वादाने आम्ही सगळे योग्य दिशेने काम करू इच्छितो.

हे ही वाचा >> “मी अजितदादांबरोबर का आणि शरद पवारांबरोबर का नाही? याचं उत्तर…”; प्रफुल्ल पटेलांचं सूचक वक्तव्य

“मी पुस्तक लिहिणार तेव्हा…”

प्रफुल्ल पटेल यावळी म्हणाले, मी खूप सौम्य व्यक्ती आहे, त्यामुळे मी कमी बोलतो. कमीच बोललेलं बरं. कारण मलाही एक दिवस माझं पुस्तक लिहायचं आहे. हे पुस्तक मी जेव्हा लिहिणार त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला काय काय समजेल हे मला आज सांगायची अजिबात इच्छा नाही.