सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती. पण, नेहरूंनी त्यांच्या वाढदिवशी कबुतरं नाही सोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:चा वाढदिवस बघून चित्ता आणला. त्यातून सगळ्यांना चित्ता सोडण्याची भीती दाखवली. आत्तापर्यंत ईडी, सीबीआय, आयकर विभाग होता. आता चित्ता आहे, असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी लगावला आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मतं व्यक्त केलं आहे. “भाजपा आणि आरएसएस विरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसला नवीन शस्त्र उभारावी लागतील. नवीन विषय मांडावे लागतील. सध्या समाजात दुही वाढत असून, तो चिंतेचा विषय आहे. ही दुही कमी करण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असेल तर, त्याची चंद्रशेखर यांच्या यात्रेशी बरोबरी झाली असती,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“काँग्रेस, शिवसेनेकडून अद्याप…”
“वंचित बहुजन आघाडीवर नेहमी आरोप केला जातो, आम्ही कोणासोबत युती करत नाही. लोकसभा, विधानसभेप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेनेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही युती करण्यास इच्छुक आहोत, असे कळवलं आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही,” असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.