प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत समावेश नसला तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यामुळे वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीत सामील होईल, अशी चर्चा सुरू होती. पण अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही. पण आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, याबाबतचा खुलासा स्वत: प्रकाश आंबेडकरांनी केला. ते अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

१९ डिसेंबर २०२३ रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी ही ‘इंडिया’ आघाडीचा भाग असणार आहे की नाही? यावरही अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. वंचितला इंडिया आघाडीत घेण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे इतर घटक पक्षांशी बोलणार आहेत, याबाबतची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.

वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आमचं बोलणं झालं आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) असं सांगितलंय की, आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीत आम्हाला घेतलं जाणार की नाही? यावर ते निर्णय घेणार. वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’त घेण्यासंदर्भात आमची नुकतीच एक बैठक झाली. त्यावेळी राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चाही झाली. त्या बैठकीत आम्ही त्यांना (उद्धव ठाकरेंना) म्हटलं की, एकतर तुम्ही तिथे निर्णय घ्या. मग आपल्याला इथे निर्णय घेता येईल.”

हेही वाचा- “मी अजून म्हातारा झालो नाही, लयभारी लोकांनाही सरळ करण्याची…”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

“त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, ज्यावेळी इंडिया आघाडीची बैठक होईल, त्यावेळी वंचित त्यामध्ये आहे की नाही? याचा निर्णय ते घेतील. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक झाली की त्यामध्ये वंचितबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही दोघांनी काहीही निर्णय घ्यायचा नाही, असं ठरवलं आहे. त्यामुळे आता मी काहीही उत्तर देऊ शकत नाही,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.