वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अलिकडेच छत्रपती संभाजीनगर येथील मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवर फुल वाहिली होती. त्यामुळे मोठा गदारोळ सुरू झाला होता. प्रकाश आंबेडकरांवर हिंदुत्ववादी पक्षांकडून आणि संघटनांकडून टीका सुरू आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आंबेडकर यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची मतं व्यक्त केली.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकाश आंबेडकरांना विचारलं की, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन का केलंत? त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी अभिवादन केलं म्हणजे त्याच्या कबरीवर फुलं वाहिली. आंबेडकरांच्या उत्तरानंतर त्यांना विचारण्यात आलं की, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यामागे तुमचं नेमकं काय उद्दीष्ट होतं? त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात चुकीच्या कथा सांगितल्या जात आहेत. देशात होऊन गेलेल्या राजांच्या खोटा इतिहास सांगून धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगजेबावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा काहींचा बेत होता, तो मला थांबवायचा होता, माझ्या त्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि औरंगजेबाच्या निमित्ताने जी दंगल होणार होती ती थांबली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अलिकडच्या काळात औरंगजेबाला केवळ दोष दिला जातो परंतु ते वस्तुस्थितीला धरून नाही. देशात चुकीचं नरेशन सेट केलं जात आहे. जुन्या राजांचं उदाहरण देऊन हिंदू-मुस्लीम, हिंदू-जैन असं विभाजन केलं जात आहे. औरंगजेबाने देशात ५४ वर्ष राज्य केलं. त्याने सुफी परंपरा जपली. त्याच्या चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. आपण चांगल्या बाजूंचं गुगगाण गायलं पाहिजे. वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत ते पाहिलं पाहिजे.

हे ही वाचा >> “तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरच्या वारीला येताना मटणाचा बेत!”, आमदार अमोल मिटकरींचा संताप, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मध्यपूर्वेतील मुस्लीम देशांपेक्षा जास्त मुस्लीम समुदाय भारतात राहतो, तरीदेखील सुफी पंथामुळे तिथल्या दहशतवादी संघटनांमध्ये भारतातलं कोणी गेलं नाही. १०-१२ माणसं सोडली तर इथलं कोणीच तिकडे गेलं नाही. हे जगाने मान्य केलं आहे. आपणही मान्य केलं पाहिजे.