Raj Thackeray : राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाले होते.
यावेळी राज ठाके यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. ‘दुबे… तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंना मीच हिंदी शिकवली, असं म्हणत मनसेला डिवचलं. दरम्यान, यानंतर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी खासदार निशिकांत दुबे यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘दिवस तुमचा, मैदान तुमचं, वेळ तुमची, कुठं येऊ सांगा?’, असं प्रकाश महाजन यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना म्हटलं आहे.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
“राज ठाकरेंना तुम्ही काय हिंदी शिकवता? राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफी यांच्याकडून मराठीत गाणे म्हणून घेतलेत. त्यामळे तुम्ही आम्हाला भाषा शिकवू नका. निशिकांत दुबेंपेक्षा राज ठाकरे यांची हिंदी कधीही चांगली आहे. आमचा भाषेला कधीही विरोध नाही आणि आम्ही कधीही भाषेला विरोध आहे असं म्हणत नाहीत”, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. तसेच इशारा देताना प्रकाश महाजन म्हणाले की, “निशिकांत दुबे यांना मी सांगतो की दिवस तुमचा, मैदान तुमचं, वेळही तुमची, कुठे येऊ हे फक्त सांगा. मग कोण कोणाला पटक पटक मारतं ते पाहू”, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे.
‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली’ : निशिकांत दुबे
“मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली”, अशा शब्दांत भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवारी मीरा भायंदर इथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी दुबे यांच्या पटक पटक के मारेंगे या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यावर दुबे यांनी ‘एक्स’ च्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“माज घेऊन कोणी अंगावर आला तर त्याला ठेचायचा. भाजपाचा कोणीतरी खासदार दुबे नावाचा. काहीतरी बोलला. झाली का त्याच्यावर केस? हिंदी चॅनलने चालवलं का नाही? तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे- तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे असा इशारा राज यांनी शुक्रवारी दिला होता.