सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपा व स्थानिक भाजपा नेत्यांवर आज एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे टीका केली. पंतप्रधांनांच्या डोक्यात सत्तेचा मगरूरपणा दिसून येतोय, असं त्यांनी बोलून दाखवलं.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, “त्यांना असं वाटतं सत्ता मिळाली ना जाऊ दे, लोकांना काहीपण होऊ दे आम्हाला फरक पडत नाही. आम्ही शेतकऱ्यांवर गाड्या नेऊ, शेतकऱ्यांना चिरडून टाकू, आम्ही लोकांना अटक करू. काय फरक पडतो? आम्हाला सत्ता मिळाली आहे. हा मगरूरपणा देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यातच दिसून येतोय, तर इकडचं काय? म्हणजे तेच एवढे मगरूर आहेत, तर इकडचे तर असणारच.”

तसेच, “सत्ता मिळाली की खरंतर जी आपुलकी असते, जी जाणीव असते ती वाढायला पाहिजे. आपण अजुन सहानुभुतीने काम केलं पाहिजे. आपण अजुन संवेदनशील झालं पाहिजे. पण भाजपाचं उलटंच गणित आहे. ते मगरूर होत आहेत. ते लोकांचा अंत पाहत आहेत. की बघा आम्ही सत्तेचा कितीही गैरवापर केला तरी कुणी आम्हाला हात लावू शकत नाही. त्याचं असं सुरू आहे. म्हणजे आज शेतकऱ्यांवर बुलडोझर फिरवतात आणि दुसऱ्या दिवशी उद्घटानाला जातात. फीती कापतात यांना काही लाज राहिलेलीच नाही. ते जे वर करत आहेत, तेच खाली होतय. चांगलं काम करायला गेलं तर यांची मांजर आडवी येतेच.” असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “आता लोकांना कळालं की जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा सिलिंडर परवडायचे. घरगुती तेल परवडायचं. पेट्रोल-डिझेल परवडायचं. आता तर सगळचं दुष्काळात तेरावा महिना एकतर लॉकडाउनची सावली सगळ्यांवर आणि त्यामध्ये अशी परिस्थिती. कसं जगावं लोकांनी? आणि त्यातही मगरूरपणा. म्हणजे किती अंत पाहत आहेत या देशातील लोकांचा हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे.” असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.