रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचा सुपूत्र, प्रसिद्ध पखवाजवादक प्रथमेश तारळकर याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देशपातळीवर सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी येथे दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रथमेशला संगीत अलंकार ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर पं.गणेश आण्णा चौधरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी संगीत क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे.
प्रथमेश हा रत्नागिरीतील एक संगीत रत्न आहे. त्याने आपल्या पखवाजवादनाने राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. आता त्याने देशपातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. संगीत क्षेत्रातील प्रख्यात शास्त्रीय, उपशास्त्रीय नामवंत गायक पं. संजीव अभ्यंकर, पं. शौनका अभिषेकी, पं. आनंद भाटे, पं. रघुनंदन पणशीकर, तसेच विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, विदुषी देवकीताई पंडित, विदुषी मंजुषा पाटील यांना प्रथमेशने पखवाज साथ केली आहे. यंदा शास्त्रीय संगीततील जगविख्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही वादन केले आहे.
प्रथमेश वयाच्या ८ व्या वर्षांपासून पखवाज वादनाचे शिक्षण घेत आहे. प्रथमेशने गुरू परशुराम गुरव आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे गिरविले आहेत. आपण हे यश गुरूंबरोबरच तसेच आई संध्या वडिल संजय तारळकर आणि त्याच्यासोबत कायम पाठीशी असलेला मित्रपरिवार यांच्या कृपाशीर्वादाने मिळविल्याचे प्रथमेशने सांगितले.