राहाता: प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ग्रामीण क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणारा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार प्रदान करून महाविद्यालयाचा गौरव करण्यात आल्याची माहिती उपप्राचार्य डाॅ. आर. ए. पवार यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. क्रीडांगणासह विविध खेळाचे साहित्य उपलब्ध असल्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी हे विविध खेळात देश पातळीवर पोहोचले आहेत. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, त्यामुळे क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालयाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राला मोठी ऊर्जा मिळाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी अभिनंदन केले आहे.
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या विविध शाखेमध्ये तीन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयामध्ये मैदानांबरोबरच सुसज्ज जिमखाना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा स्पोर्ट अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालयांत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र, प्रवरा पोलीस आणि सैन्यदल मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. खेळातून विद्यार्थी पुढे जावेत यासाठी कमवा व शिका योजना, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विशेष प्रोत्साहन खेळाडूंना दिले जाते. महाविद्यालयात प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयाबरोबरच प्रवरा परिसरातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगार संधी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवरेच्या विद्यार्थ्यास नोकरी बरोबरच स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने विविध कौशल्य आधारित आधारित प्रशिक्षणे महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित केले जातात यासाठी महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रही सुरू करण्यात आले आहे.