छत्रपती संभाजीनगर – टेक कॅमेरा… सायलेन्स…ॲक्शन रोलिंग… अशा सूचना एखादा कोवळा तरूण पर्यटनस्थळी दिसत असेल तर ते एखाद्या चित्रपटाचं चित्रिकरण नाही की एखाद्या वेबसिरीजचे शूट. ते असेल नव्या दोन चेहऱ्यांना घेऊन सुरू असलेले प्री-वेडिंगचे शूटिंग! नियोजित लग्नातील वधू-वरांचे मेकअप करून, त्यांच्यावर फ्लॅश-लाईट सोडून आणि काही सिन्समध्ये कशा हालचाली करायच्या अशा सूचना देणारा आणि सोबत लवाजमा घेऊन प्री-वेडिंगच्या चित्रीकरणामध्ये रमलेल्या दृश्य काही पर्यटनस्थळांवर दिसू लागली असून, त्यासाठी ऐतिहासिक स्थळांना पसंती मिळत आहे.
दिवाळीनंतर तुळशीचे लग्न आणि लगेच
लग्नसराई हंगाम सुरू, असे दरवर्षीचे आपले चक्र असते. अलिकडे प्री-वेडिंग हा प्रकार लग्नघरांमध्ये सुरू झाला असून त्यासाठी गड किल्ले मोठे प्रचंड मोठे तलाव धरण परिसर जंगल भाग धबधब्या या ठिकाणी चित्रीकरणसाठी आता नियोजित वधू-वर जाताना दिसत आहेत. चित्रीकरणासाठी गड किल्ल्यांच्या परिसरात डेरा टाकला जात आहे.
किल्ले रायगड, किल्ले दौलताबादसह ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात व पैठणमधील नाथसागर, ज्ञानेश्वर उद्यान परिसर, अहिल्यानगरच्या काही निसर्गरम्य गाव-परिसरामध्ये सध्या प्री-वेडिंग चित्रीकरण वाढलेले आहे. या ठिकाणी सायंकाळचा सनसेट किंवा तांबड फुटायच्या वेळेसचा सनराइजची वेळ निवडून असे काही स्थळं निश्चित केले जात आहेत. स्पॉट बुकिंग किंवा लोकेशनवाल्यांकडून सातशे ते आठशे रुपये घंटा यानुसार दर ठरवण्यात येतात.
शूटिंग नंतरचा एडिटिंग – ज्यामध्ये सेफिया टोन, क्रोमा-की मध्ये जाऊन वधू किंवा वर यांना लहान-मोठ्या आकारात मागे-पुढे करणे आणि पार्श्वसंगीत, प्रसंगानुरूप पण कर्णमधुर गाण्यांचे मिश्रण हा भाग हा प्री-वेडिंगचा महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे एक ते पाच मिनिटांच्या प्री-वेडिंगच्या शूटिंगसाठी ७५ हजार ते तीन लाखांच्या पर्यंतचे दर निश्चित केले जात असून त्यासाठी उत्तम प्रकारचे कॅमेरे, ॲडव्हॉन्स फोर- के कॅमेरे, सिनेमॅटिक कॅमेरे, कॅंडिट फोटो कॅमेरे, ड्रोन कॅमेरे आणि चार-पाच जणांचा सहकारी वर्ग असा लवाजमा लागत असतो. दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) हे शूटिंग चालत असल्याचे या व्यवसायातील तंत्रज्ञ सांगत आहेत.
पूर्वी आफ्टर वेडिंग होते. लग्नानंतरचे. त्यात नवपरिणित दाम्पत्याची मने जुळलेली असायची. तसे भाव चेहऱ्यांवर उमटायचे. परंतु आता त्याऐवजी प्री-वेडिंगचा प्रकार अलिकडे वाढलेला आहे. पूर्वी व्हीएचएस व्हिडिओ कॅमेरे असायचे. कॅसेट दिली जायची. पण आता नव्या बदलानुसार संदर्भ बदलले असून, अत्याधुनिक यंत्रणा-तंत्रज्ञांच्या माध्यमातून, पटकथा तयार करून प्री-वेडिंग केले जात आहे, असे व्यावसायिक आणि सिनॅमॅटिक तंत्रज्ञ राजेश गठाडे यांनी सांगितले.
राजेश गठाडे सांगतात की, प्री-वेडिंग हे सधन घरातल्या मंडळींकडून आवर्जून केले जात आहे. हौसेला मोल नसतं. वधू-वरांचीही इच्छा असते. लग्नाचं सर्वांनाच कौतुक असते. त्याच्या गोड आठवणींचा ठेवाही या निमित्ताने राहतो. वधू-वरांची मने जुळण्यातही महत्त्वाचा भाग ठरतो. साधारणपणे ७५ हजार ते दोन ते तीन लाख खर्च येतो. त्यात चित्रपटाप्रमाणे सर्व तंत्रज्ञ यंत्रणा वापरली जाते आहे. एडिटिंग, गाणे, त्यानुसार लोकेशन, तिथपर्यंत वाहन करून जाणे आदी प्रकार पाहता खर्च वरीलप्रमाणे येतो. मराठवाड्यासारख्या भागातही आता प्री-वेडिंग केले जात आहे. लग्नपत्रिकेसोबत किंवा प्री-वेडिंगमध्येच पत्रिका बसवून केलेला व्हिडिओ पाठवून दिला जातो.
