सांगली : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रविवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून ताशी ४३ किलोमीटर या गतीने वेगवान वारे मात्र वाहत होते. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या असल्या, तरी फारसी हानी कोठेही झाल्याचे वृत्त नाही.

तौत्के चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्य़ात पहाटेपासून जोरदार वारे वाहत आहे. पहाटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र दहानंतर पावसाने विश्रांती घेतली असली, तरी ढगाळ हवामान कायम होते.

दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. मात्र ऐन वैशाख महिन्यात हवामानात कमालीचा गारवा निर्माण झाला असून आज कमाल तपमान २३ सेल्सियसपर्यंत होते. तर हवेतील आद्र्रता ८९ टक्के होती. तर दक्षिणपूर्व दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ४३ किलोमीटर इतका होता. दुपारनंतर वाऱ्याचा वेग मंदावल्यानंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरू होती.

जिल्ह्य़ातील सांगली, मिरज शहरासह इस्लामपूर, शिराळा, विटा, पलूस परिसरातही पावसाने हजेरी लावली. भिलवडी परिसरात काल वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा आज पाऊस झाल्याने रस्ते चिखलमय झाले आहेत. तर जत तालुक्यातील उमदी, संख, आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातही आज जोरदार वाऱ्याने वाडीवस्तीवरील झोपडय़ांचे नुकसान झाले आहे.

करोना संकटामुळे शहरात संचारबंदी असल्याने रस्त्यावर अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकाविना अन्य फारसे कोणी नव्हते. तथापि, बंदोबस्तासाठी चौका-चौकामध्ये असलेल्या पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचे हाल झाले.

सांगलीतील आयर्वनि पुलावरून दिसणारे ढगाळ हवामान.