कराड : ऑलिम्पिकवीर मल्ल खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनातर्फे उभारल्या जाणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. आमदार डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार भोसले यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुंबईत क्रीडामंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुंबईतील शशी प्रभू ॲन्ड असोसिएटने या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा बनवला असून, बैठकीत ज्येष्ठ वास्तुविशारद अमृता पारकर यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेला आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात घेऊन हा आराखडा तयार केल्याचे अमृता पारकर यांनी सांगितले.

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी या आराखड्याचे कौतुक करून, या क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या संकुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी. तसेच आवश्यक त्या पातळीवर तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही क्रीडामंत्र्यांनी दिली. कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप याही याप्रसंगी उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रीडामंत्र्यांनी सदर आराखड्याचे कौतुक करून, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला बैठकीवेळी दिले. भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पहिलवान खाशाबा जाधव यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी खाशाबांच्या गोळेश्वर या जन्मगावी त्यांच्या नावाने भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे. या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुल भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. तसेच शासनस्तरावर संकुलाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष यश येत असल्याने कुस्ती क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.