कामगारांचे आंदोलन सुरूच
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनासाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनास सामोरे जाण्याऐवजी अध्यक्षांनी आपल्या समर्थक संचालकांसह आपल्या पदाचे राजीनामे साखर संचालकांकडे पाठविले. यामुळे वसाकाच्या विरोधी संचालकांच्या भूमिकेकडे कामगारांचे लक्ष लागले असून त्यांनी कारखान्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली आहे.
थकीत वेतन व बोनस, वेतन फरक आदी मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी वसाकाच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकून कामगारांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सुरू असतानाच अध्यक्ष जे. डी. पवार व त्यांच्या समर्थक संचालकांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आल्याने कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. कामगारांनी कारखान्याचे काम पूर्णपणे बंद पाडले आहे. प्रक्रिया केलेला माल तयार केल्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत कारखाना सुरू होऊ न देण्याचा निर्णय घेतला. यामुळे कारखान्याच्या आवारात आलेल्या सुमारे ४० मालमोटारी ऊस शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अन्य कारखान्यांकडे वळविण्यात आल्याचे सांगितले जाते.