मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : देशाच्या पंतप्रधानपदावर लवकरच मराठी माणूस दिसेल, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. नागपुरात आयोजित जागतिक मराठी संमेलनात जाहीर मुलाखतीत ते बोलत होते.

जागतिक मराठी अकादमीतर्फे नागपुरात आयोजित १६ व्या जागतिक मराठी संमेलनात ज्येष्ठ कवी आणि अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि आशुतोष शेवाळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

देशाच्या पंतप्रधानपदावर मराठी माणूस कधी आरूढ होणार, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, २०५० पर्यंत देशाला एक नव्हे अनेक मराठी पंतप्रधान मिळतील. त्याची फार काळ वाट पहावी लागणार नसून लवकरच मराठी माणूस पंतप्रधानपदी दिसेल! जगाच्या कानाकोपऱ्यात मराठीचा झेंडा उंचावण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी एक नव्हे तर अधिक मराठी व्यक्ती आपण निश्चित पाहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, देश आज संक्रमणावस्थेत असून आरक्षणाच्या विषयावर  येणारा काळच उपाय योजना सुचवेल.  संधीचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी क्षेत्रात संधी आहे. मात्र ती मिळवण्यासाठी तसा समाज तयारा करावा लागेल.

‘आरक्षणाने केवळ मनाचे समाधान’

सरकारी नोकरीत केवळ ५० टक्के आरक्षण दिले जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही वर्गाला आरक्षण दिले तरी सरकारी नोकऱ्यांमध्ये या आरक्षणाचा फारसा लाभ होणार नाही, केवळ मनाचे समाधान तेवढे होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पाच ते १० वर्षांनंतर जसजशा खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध होतील तसे आरक्षणाचे महत्त्व आणि माहात्म्य कमी होईल, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister soon marathi man says cm devendra fadnavis
First published on: 05-01-2019 at 02:31 IST