राज्याच्या इतिहासातील राजकीय व वित्तीय दृष्टीने कसोटीच्या कालखंडात विलासराव देशमुख यांनी राज्याला भक्कम नेतृत्व दिले. त्यांचे स्मारक नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केले .
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून, त्यांच्या आठवणी जागविणारे एक स्मृती संग्रहालयही उभारण्यात आले आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती संग्रहालयाचे उदघाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर होते. यावेळी व्यासपीठावर लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्याचे परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माणिकराव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती संग्रहालयाचे उदघाटन हा भावपूर्ण आठवणी जागवणारा कार्यक्रम आहे. विलासरावांच्या निधनानंतर दोन वर्षे उलटली आहेत, यावर विश्वास बसत नाही. त्यांनी मराठवाडा विभागाला विकास प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कामाचा डोंगर उभा केला. लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था शिस्तीने चालविल्या. मराठवाड्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी विविध प्रकल्पांना आकार दिला. हे सर्व करताना राज्याच्या अन्य भागातील विकास प्रकल्पांना गती दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे यासाठी ध्यास घेत विविध विकास कामांना चालना दिली .
मराठवाड्यातील ग्रामीण भागात उदयाला आलेले विलासरावांचे व्यक्तिमत्व त्यातील नेतृत्व गुणामुळे सुरुवातीपासूनच एक विश्वास निर्माण करणारे ठरले , असे नमूद करुन चव्हाण म्हणाले, एकेकाळी राज्य मंत्रिमंडळातील अतिशय महत्त्वाची अशी एकापेक्षा अधिक खाती विलासरावांनी एकहाती लीलया सांभाळली . त्यांनी राज्याचे नेतृत्व केले तेव्हा तो कालखंड राजकीय व वित्तीय दृष्टीने आव्हानात्मक होता. अशा कालखंडात आघाडीचे सरकार चालवून दाखविण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. किंबहुना त्यांनी त्यावेळी राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीचा पाया घातला आणि त्यानुसारच गेली १५ वर्षे सरकारची वाटचाल सुरु आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
विलासराव देशमुखांचे स्मारक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री
राज्याच्या इतिहासातील राजकीय व वित्तीय दृष्टीने कसोटीच्या कालखंडात विलासराव देशमुख यांनी राज्याला भक्कम नेतृत्व दिले.
First published on: 11-08-2014 at 07:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan inaugurates vilasrao deshmukh memorial in latur