scorecardresearch

पर्यटकांच्या नोंदी ठेवण्याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष; माथेरानच्या घटनेनंतर गांभीर्य वाढले

माथेरान येथील इंदिरा नगर परिसरात एका खासगी लॉजमध्ये रविवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

|| हर्षद कशाळकर

माथेरानच्या घटनेनंतर गांभीर्य वाढले

अलिबाग: माथेरानमधील हत्याकांडांचा २४ तासांत उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले असले तरी या घटनेनंतर पर्यटन व्यवसायातील हलगर्जीपणा समोर आला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हातील माथेरानसह अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन हे तालुके कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आली आहेत. दरवर्षी या परिसरास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होत आहे. त्यामुळे स्थानिकांनी आपल्या जागेत पर्यटकांसाठी लहानमोठी निवास न्याहारी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक दाखल होत असतात. मात्र येणाऱ्या पर्यटकांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवली जात नसल्याचे माथेरान येथील हत्याकांडानंतर पोलीस तपासादरम्यान समोर आले आहे. ही एक चिंतेची बाब आहे.

माथेरान येथील इंदिरा नगर परिसरात एका खासगी लॉजमध्ये रविवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीबरोबर लॉजवर आलेल्या व्यक्तीने तिची रात्री हत्या केली आणि तो पसार झाला. त्याने खोली भाड्याने घेताना केलेली नोंदही खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी चोवीस तासांत मारेकऱ्याला अटक केली.

येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेणे, त्यांची ओळख पटवून घेणे, ओळखपत्रांची एक प्रत मागून घेणे, त्यानंतरच पर्यटकांना प्रवेश देणे आवश्यक आहे. पोलिसांकडून पर्यटन व्यावसायिकांना याबाबत वारंवार सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र त्यास फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे या प्रकरणावरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांत अनधिकृत लाजिंजग-बोर्डिंग आणि निवास न्याहारी केंदे्र उघडली जात आहेत ज्यांची कुठेही नोंद केली जात नाही. स्थानिकांना रोजगार मिळत असल्याने स्थानिक प्रशासनही त्याकडे डोळेझाक करते. यामुळे व्यावसायिकांमध्ये बेफिकिरी वाढते. त्यामुळे प्रशासनाकडून अशा अनधिकृत केंद्रांवर वचक ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रत्येक निवास न्याहरी केंद्राची, लरॉजग-बोर्डिंग केंद्रांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्या केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची नोंद ठेवणे, त्यांची ओळख पटवून त्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे.

आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची नोंद पर्यटक व्यावसायिकांनी ठेवणे आवश्यक आहे. त्यांची ओळखपत्रे घेऊन त्यांची एक प्रतही ठेवून घेणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी या संदर्भातील सूचना दिल्या जातात; पण व्यावसायिक त्याकडे दुर्लक्ष करातात. माथेरानमधील घटना लक्षात घेऊन व्यावसायिकांनी योग्य काळजी घ्यायला हवी.  – अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Professionals neglect to keep tourist records seriousness increased after the matheran incident akp