नांदेड : जनसंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवदर्शन’ विचारास ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याचा हीरकमहोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्यपाल तथा कुलपतींनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांना पत्र पाठविल्यानंतर राज्याच्या उच्च शिक्षण विभागानेही आपल्या अखत्यारितील शैक्षणिक संस्थांना विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना पंधरवड्यापूर्वी सविस्तर पत्र पाठविले आहे. यानिमित्ताने सर्व विद्यापीठांमध्ये एकात्म मानवतावादावर एक अध्यासन स्थापन करण्याचा आदेशही या पत्रामध्ये देण्यात आला आहे.
युवा वर्गाच्या सक्षम व प्रभावी सहभागावर सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती अवलंबून असते. जगभरात सर्वात जास्त युवा वर्ग भारतामध्ये असून त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे तसेच राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रेरित करणे आवश्यक आहे. याच जाणीवेतून उपाध्याय यांनी एकात्म मानवदर्शन हा लोककल्याणकारी विचार राष्ट्राला दिला, असे नमूद करून देवळाणकर यांनी उच्च शिक्षण देणार्या सर्व संस्थांना या विचाराचा हीरकमहोत्सव २२ एप्रिल २०२६ पर्यंत साजरा करण्याचे आदेशच दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर नांदेडमधील विद्यापीठ विकास मंच या संस्थेने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांना नुकतेच एक निवेदन सादर केले. राज्यपाल तथा कुलपतींनी तसेच उच्चशिक्षण संचालकांनी पाठविलेल्या पत्राचा संदर्भ देत एकात्म मानवदर्शन विचाराच्या हीरकमहोत्सवाचे कार्यक्रम घेण्यासाठी समिती स्थापन करण्यासह इतर मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. या मागण्या विद्यापीठ प्राधिकरणांतील राज्यपाल तथा कुलपतीनियुक्त सदस्यांनी पुढाकार घेऊन केल्या. त्यामध्ये डॉ.प्रशांत पेशकार, प्रा.संतराम मुंडे, धनराज जोशी, प्रमोद देशमुख, अशोक गुजराथी यांच्यासह अॅड.केदार जाधव यांचा समावेश होता.
एखाद्या राजकीय पक्षाच्या दिवंगत नेत्याने आपल्या हयातीत मांडलेले विचार किंवा त्या अनुषंगाने दिलेल्या भाषणांचा उत्सव-महोत्सव त्या-त्या पक्षांच्या पातळीवर झाले असतीलही; परंतु एखाद्या राजकीय नेत्याच्या विचारांचा हीरकमहोत्सव साजरा करण्याचे आदेश उच्चशिक्षण संस्थांना देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा, असे सांगितले जात आहे. पं.उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष २०१६ साली होऊन गेले, तेव्हा केंद्रात आणि राज्यातही भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत होते. त्या वर्षात राज्यातील शैक्षणिक संस्थांना कोणतेही कार्यक्रम दिले गेले नव्हते. शिक्षण संचालकांच्या पत्रात तर उपाध्याय यांच्या जन्म-मृत्यूची तारीख चुकीची असल्याचे दिसते.
एकात्म मानवदर्शनच्या हीरकमहोत्सवानिमित्त विद्यापीठ/महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करणे, कार्यक्रम आयोजनासाठी प्रभारी प्राध्यापकाची नियुक्ती करणे आणि त्यात किमान ३५ टक्के विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती ते स्मृतिदिन या कालावधीत व्याख्याने व अन्य कार्यक्रम आयोजित करणे, उपाध्याय यांच्या जीवनावरील संबंधित साहित्याचा ग्रंथालयांमध्ये स्वतंत्र विभाग करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे, इत्यादी कार्यक्रम देण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा खर्च संबंधित शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांनी करावा, असे शिक्षण संचालकांच्या आदेशात म्हटले आहे.