दिगंबर शिंदे

सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे झालेल्या नऊ जणांच्या सामूहिक हत्येचे गूढ पोलिसांच्या आठ दिवसांच्या अथक प्रयत्नाने उकलले. गुप्तधनाच्या लालसेतून मांत्रिकाने केलेल्या नऊ जणांच्या हत्याकांडामुळे पुरोगामी विचारांच्या जिल्ह्याला कलंक लागला. पाच वर्षांपूर्वी याच गावात भ्रूणहत्येचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. आता पुन्हा हे सधन गाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

मृतदेहाजवळ दोन चिठ्ठय़ा आढळल्याने पोलिसांनी प्राथमिक पातळीवर सावकारी कर्जातून आत्महत्येचा प्रकार झाल्याचा निष्कर्ष माध्यमासमोर मांडून काही खासगी सावकारांना गजाआड केले. मात्र, सामूहिक आत्महत्या मान्य करायला समाजमन मान्य नव्हते. गेल्या चार वर्षांपासून एकाच कुटुंबातील दोन भावांचा सार्वजनिक क्षेत्रातील वावर संशयास्पद तर होताच, पण सर्व कुटुंबच सुशिक्षित असल्याने गुप्तधनाच्या किंवा अघोरी कृत्याच्या पाठीशी ही मंडळी सहजासहजी लागतील असे वाटत नव्हते.

मुंबईमध्ये सत्तांतराचा खेळ विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झाला. माध्यमातून याची चर्चा रंगली जात असताना बारा-पंधरा हजार लोकवस्तीचे मिरज तालुक्यातील म्हैसाळ हे गाव वनमोरे कुटुंबाच्या कथित सामूहिक आत्महत्येच्या प्रकारामुळे स्तंभित झाले होते. एकाच कुटुंबातील दोन भाऊ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन-दोन मुले आणि वयस्कर आई अशा नऊ जणांचे मृतदेह दोन ठिकाणी असलेल्या घरात आढळून आले. हा प्रकार गावाला तर अचंबित करणारा होताच, पण जिल्ह्याचे मन हेलावणारा होता. या प्रकारामुळे अख्खा जिल्हा हादरला असताना यावर चर्चा होऊन काही तरी ठोस माहिती पुढे येईल, यामागील कारणांचा शोध लागेल अशी अपेक्षा होती. अखेर पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आलीच.

मिळालेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीतून सावकारी कर्जाच्या परतफेडीवरून होत असलेल्या मानभंगाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या चिठ्ठीत ज्यांची ज्यांची नावे आहेत अशा २५ जणांपैकी १९ जणांना तर गजाआड करण्यात आले. मात्र, या आत्महत्याग्रस्त वनमोरे कुटुंबाकडे सावकारी कर्ज नेमके किती होते, कोणा-कोणाचे होते याचा उलगडा अद्याप झालेला नाही. अख्खे कुटुंबच यात गुरफटले गेले होते हे मान्य होण्यासारखे नाही. कारण मुख्य दोन्ही भाऊ, मुले सुशिक्षित होती. यापैकी एक जण बेडगमध्ये माध्यमिक शाळेत शिक्षक, दुसरा पशुवैद्यक, तर एक मुलगी कोल्हापूरमध्ये एका बँकेत नोकरी करणारी. घरात पैशाची आवकही बऱ्यापैकी, राहणीमान मध्यमवर्गीय घराप्रमाणे असल्याने कर्जवसुलीच्या तगाद्याने टोकाचा निर्णय घेतला जाऊ शकेल हे समाजमनाला अद्याप पटलेले नाही.

यामागे गुप्तधनाचा हव्यास असू शकेल, अशी चर्चा मात्र जोरात होती. कारण घटनेच्या आदल्या दिवशी एकाच वेळी करण्यात आलेली वीस नारळांची खरेदी ही गूढ वाटत आहे. तसेच शेजाऱ्याकडून मिळणाऱ्या माहितीनुसार रात्र-अपरात्री दोन्ही भावांमध्ये चालत असलेला गुप्त संवाद, अनोळखी व्यक्तींची वर्दळ शंकेला बळकटी देणारी वाटत आहे. पोलिसांनी मांत्रिकांच्या शोधासाठी सोलापूर, पुणे, नांदेड आदी ठिकाणी छापे टाकले. पोलीस दप्तरी असे प्रकार करणारा कोणी आहे का याचा शोध घेतला असता सोलापूरचा भोंदू नजरेसमोर आला. अब्बास बागवान हा यातील मुख्य सूत्रधार असल्याचे सध्या तरी समोर आले आहे. या प्रकारामागे निश्चितच एखादे गूढ कारण असण्याची शक्यता गृहीत धरूनच पोलिसांचा तपास सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणामागील सत्य समाजासमोर येण्याची गरज व्यक्त करीत योग्य तपासाची अपेक्षा व्यक्त केली होती.

या घटनेतील वनमोरे कुटुंब सुशिक्षित आणि सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी असलेले कुटुंब आहे. या कुटुंबाने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कर्ज कशासाठी घेतले होते याचे कोडे उलगडले तर निश्चितच यामागील कारणाचा शोध अधिक लवकर लागणार आहे. ज्यांची नावे संशयित यादीमध्ये आहेत ते सर्व खासगी सावकारी करणारेच आहेत असेही नाही. यापैकी काही पतसंस्थांचे अध्यक्ष, डॉक्टर, शिक्षक असे प्रतिष्ठित आहेत. काही जणांकडून हातउसने पैसे घेतले आहेत, तर काही जणांकडून भरमसाट व्याजाने म्हणजे मासिक दहा टक्के दराने कर्ज घेतले आहे. काही जण सावकारीप्रकरणी हद्दपार झालेले आहेत. यामुळे वनमोरेने ज्यांच्या ज्यांच्याकडून मिळतील तसे पैसे घेतले आहेत हे स्पष्ट होते. कमी वेळेत, कमी श्रमात जास्त मोबदला मिळविण्याची आस असल्याने गुप्तधनाच्या मागे हे कुटुंब लागले होते. यातूनच जिथून पैसे मिळतील तेथून कर्जाऊ रक्कम उचलली. अगदी पाहुण्यारावळय़ाकडूनही रक्कम घेतली आहे. यातून वाढलेला कर्जबाजारीपणा मांत्रिकाच्या आहारी जाण्यास भाग पाडणारा ठरला.

या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दोघा संशयाविरुद्ध दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापूजा करून गुप्तधन मिळणार असल्याची बतावणी करीत काळय़ा चहातून विष देऊन नऊ जणांची वेगवेगळय़ा ठिकाणी हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी वापरण्यात आलेले विष कोणते? या हत्येमागे आणखी काही व्यक्ती आहेत का, याचा शोध घेण्याचे आव्हान तपास अधिकाऱ्यांसमोर आहे.