scorecardresearch

खेड तालुक्यातील सोनगावात ‘मगर दर्शना’द्वारे पर्यटनाला चालना

खेडच्या खाडीपट्टय़ात मगरींचे वास्तव्य असून कांदळवनांची बेटेही विस्तारलेली आहेत. त्यांचे रक्षण करतानाच सोनगाव येथील मगरींचा वावर लक्षात घेऊन त्यांच्या आधाराने पर्यटन विकसित करण्याचा उपक्रम शासनाच्या वन विभाग व कांदळवन कक्षाने हाती घेतला आहे.

रत्नागिरी : खेडच्या खाडीपट्टय़ात मगरींचे वास्तव्य असून कांदळवनांची बेटेही विस्तारलेली आहेत. त्यांचे रक्षण करतानाच सोनगाव येथील मगरींचा वावर लक्षात घेऊन त्यांच्या आधाराने पर्यटन विकसित करण्याचा उपक्रम शासनाच्या वन विभाग व कांदळवन कक्षाने हाती घेतला आहे. या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने सोनगाव-भोईवाडीत ‘वाशिष्ठी मगर सफारी’ चा शुभारंभ झाला आहे. या उपक्रमात फेरी बोटीमधून एका वेळी आठ जणांना एक तासाची सफर घडवून आणली जाणार आहे.

खेड तालुक्याच्या हद्दीत असलेल्या सोनगावमध्ये वीसपेक्षा जास्त मगरींचे वास्तव्य दिसून आले आहे. जलपर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांना मगर (क्रोकोडाईल) सफारीचे आयोजन करून येथील गावच्या विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान मुंबई व रत्नागिरी येथील कांदळवन कक्षामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. या माध्यमातून सोनगाव येथे कांदळवन सह-व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने सोनगाव येथे वाशिष्ठी-मगर सफारी सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी केली. कांदळवन प्रतिष्ठानकडून सोनगावला आठ आसनी मोटार बोट देण्यात आली आहे. सोनगाव भोईवाडी येथे अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर वाशिष्ठी मगर सफारीह्ण बोटीचा आरंभ झाला. सोनगावच्या सरपंच भारती पडवळ यांच्या हस्ते या वेळी नौकेचे पूजन करून नंतर मगर सफारी करण्यात आली व आलेल्या मान्यवरांना कांदळवनाबद्दल माहिती देण्यात आली.

कांदळवन कक्ष रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील यांनी या वेळी उपजीविका निर्माण योजनेबद्दल माहिती दिली व पर्यटनाबद्दल मार्गदर्शन केले. कांदळवन कक्षातर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोजगाराभिमुख उपक्रम

या सफरीसाठी एका व्यक्तीला दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार असून उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने समिती स्थापन केली आहे. पर्यटकांना माहिती देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना कांदळवन कक्षातर्फे प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये प्रमुख आकर्षण खाडीतील मगरी हे असले तरी त्याचबरोबर किनाऱ्यावरील कांदळवनांची माहिती आणि पक्ष्यांचीही ओळख होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Promoting tourism magar darshan songaon khed taluka crocodiles reality ysh

ताज्या बातम्या