आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ३ गुन्हे दाखल झाले आहेत. या बरोबरच ४२ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिली.
आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी ६ विधानसभा मतदारसंघांत १८ पथके स्थापन केली आहेत. आचारसंहितेचा भंगप्रकरणी आतापर्यंत ३ गुन्हे दाखल झाले आहेत. जिंतूर येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सभेनिमित्त विनापरवाना रॅली काढली. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल केला. परभणीत गंगाधर जवंजाळ यांनी काढलेल्या दुचाकी रॅलीसंदर्भातही नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना रॅली काढली. या प्रकरणातही मुजाहित खान व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.
मागील विधानसभा निवडणुकीतील ६८, तर लोकसभेचे ९ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत, असेही सिंह यांनी सांगितले. जिल्हाभर ४५ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार असून ४ दिवसांत या प्रस्तावांना मंजुरी मिळेल. निवडणूक काळात जातीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. जिल्ह्यात १ हजार १२७ शस्त्र परवानाधारक असून, यातील २४५जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दि. २५ पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणीची संधी आहे. यंदा एक लाख नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे.
मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम राबविला जाणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सोबत विधानसभानिहाय निवडणूक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. एकूण १ हजार ९७४ मतदान केंद्रे असून, १७ लाख ६५ हजार मतदार आहेत. मागील निवडणुकीत ५४ टक्के मतदान झाले. यंदा ही टक्केवारी वाढविण्यास प्रयत्न केले जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal 42 persons banished
First published on: 19-03-2014 at 01:52 IST