ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येचा कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्य़ांमधून उत्स्फूर्त निषेध करण्यात आला. रायगड जिल्ह्य़ात आमदार मीनाक्षी पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्य़ात दापोली येथे आज संध्याकाळी आयोजित सभेत सर्वश्री डॉ. प्रशांत मेहता, शांता सहस्रबुद्धे, जयवंत जालगांवकर, दादा इदाते, अश्विनी वैद्य, पत्रकार मनोज पवार इत्यादींनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करून त्यांनी केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. चिपळूण येथे काल संध्याकाळी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित सभेत राजन इंदुलकर, खलिद दलवाई, प्रा. डॉ. जी. बी. राजे, सुनील खेडेकर इत्यादींनी या हत्येचा निषेध केला. तसेच तहसीलदार जगदीश कातकर यांच्यामार्फत शासनाला सादर केलेल्या निवेदनावर जादूटोणाविरोधी विधेयक तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. रत्नागिरी शहरात काल दुपारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निषेध फलक लावण्यात आला. तसेच शाहू, फुले, आंबेडकर विचारमंच आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आज संध्याकाळी मूक मोर्चा व निषेध सभा आयोजित करण्यात आली. नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेटय़े आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी इत्यादी ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोर्चे काढून या खुनी हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला.