संगमनेर : घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तनकाराच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संगमनेरमध्ये आज मोर्चा काढण्यात आला होता. संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होत असून अशांतता निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाविकास आघाडी आणि विविध संघटनांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. यशोधन येथून निघालेला हा मोर्चा नवीन नगर रोड येथे आल्यानंतर तेथे निषेध सभा झाली. या वेळी थोरात म्हणाले की, हा स्वातंत्र्यसैनिकांचा तालुका आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. आपण केलेला विकास काहींना पाहवत नाही म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे षडयंत्र आखले जात असून त्यांना वेळीच रोखा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, थोरात यांनी सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी राजकारण करत हा तालुका उभा केला. ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तर मीही विरोधी पक्षाचा आमदार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरू नये. थोरात यांच्या नेतृत्वाखाली मी सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असेही ते म्हणाले. जयश्री थोरात यांचेही यावेळी भाषण झाले.
अमोल खताळांची थोरातांवर टीका
तालुक्यातील विकासाची घडी आता चांगल्या पद्धतीने बसत आहे. विरोधकांना आता हे सहन होत नाही म्हणूनच त्यांच्यावर मोर्चे काढण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टीका केली. खताळ म्हणाले, की त्यांच्याविषयी आता कोणालाही सहानुभूती राहिलेली नाही. त्यांच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही. मला कोणी समज देण्याचे सल्ले देण्यापेक्षा भविष्यात राहुल गांधीच तुम्हाला आता समज देऊन घरात बसवतील. ग्रामीण भागातील समस्याही वेळेत सुटत असल्याने त्यांची चाळीस वर्षांची अपयशी कारकिर्द उघडी झाली आहे. याचेच शल्य त्यांना होत असल्याची खोचक टीका खताळ यांनी या वेळी केली.