येथील पीएसपीएस इंडिया मल्टीट्रेड अँड सव्र्हिसेस या कंपनीत गुंतवणूक केल्यास मुद्दलाच्या तीनपट रक्कम ३० महिन्यात देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारा कंपनीचा म्होरक्या रवींद्र भागोराव डांगे व अशोक प्रभाकर गायकवाड या दोघांना पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी या गुन्ह्यात ६ आरोपींना अटक झाली.
मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील कृष्णा ज्ञानोबा होगे यांच्या तक्रारीवरून १० जूनला पीएसपीएस या बनावट कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डांगे व गायकवाड हे दोघे फरारी झाले. पोलिसांनी या दोघांच्या शोधासाठी पथके तयार केली. परंतु त्यांचा थांगपत्ता महिना-दीड महिना पोलिसांना लागला नाही. डांगे व गायकवाड कोकणात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे संजय वळसे, माधव लोकुलवार, लक्ष्मण उपलेंचवार, शिवाजी धुळगुंडे, मोईन फारुखी व बालाजी रेड्डी यांचे पथक पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी कोकणात पाठविले. रत्नागिरी येथे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पीएसपीएस कंपनीविरोधात फसवणुकीच्या ५१ तक्रारी आल्या असून, आजपर्यंत १२ लाख रुपये जप्त केले आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी रविकुमार राठोड, आनंद वाघमारे, प्रकाश राठोड, पंडित चव्हाण, राजेश घनघाव, सतीश थोरात यांना अटक झाली. डांगे याची परभणी, नांदेड, लातूर, जालना, िहगोली, पुणे येथे विविध बँकांत खाती असून, या खात्यांमध्ये २८ कोटींची उलाढाल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. आणखीही अनेक बँकांत त्यांची खाती असण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलीस तपास चालू आहे.