Rahul Gandhi Defamation Case: वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या मातृवंशाची माहिती मागणारी याचिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. मार्च २०२३ मध्ये लंडन येथे एका भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करत वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.
सात्यकी सावरकर यांची आई हिमानी अशोक सावरकर या नथुराम गोडसे यांचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात देण्यात आलेली आहे.
राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावताना खासदार/आमदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी २८ मे रोजी असे निरीक्षण नोंदविले की, हा खटला राहुल गांधी यांनी लंडनमध्ये सावरकरांविरुद्ध केलेल्या कथित अवमानकारक विधानापुरता संबंधित आहे. सदर आदेश शनिवारी (३१ मे) न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते, असा आरोप करण्यात येत आहे. सात्यकी सावरकर यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी लंडन येथे बोलताना सावरकरांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. ज्यात सावरकरांनी नमूद केले आहे की, ते आणि त्यांच्या पाच ते सहा मित्रांनी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि यातून त्यांना आनंद मिळाला.
सात्यकी सावरकर म्हणाले की, वीर सावरकर यांनी असे कोणतेही पुस्तक लिहिलेले नाही. तसेच असा कोणताही प्रसंग घडलेला नाही. आपल्या याचिकेत सात्यकी सावरकर म्हणाले की, राहुल गांधी जाणूनबुजून चुकीची आणि खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरावा म्हणून सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या भाषणाचे यूट्यूबवरील व्हिडीओ आणि काही माध्यमात छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे सादर केली.
राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी याचिका दाखल करत वीर सावरकर यांनी लिहिलेल्या माझी जन्मठेप या पुस्तकाची इंग्रजी प्रत, हिंदुत्व हे पुस्तक आणि सात्यकी सावरकर यांच्या मातृवंशाची माहिती मागणी केली होती. सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सदर माहिती वकील पवार यांना दिली.
मात्र २८ मे रोजी वकील पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने अर्ज करत, तक्रारदार (सात्यकी) यांनी जाणूनबुजून त्यांच्या आईच्या वंशावळीची माहिती उघड केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कोल्हटकर यांनी सदर याचिका निराधार आणि वाईट हेतून दाखल झाली असल्याचे म्हटले.
सदर याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, सात्यकी हा वीर सावरकर यांच्या भावांपैकी एकाचा नातू आहे. सदर प्रकरण त्यांच्या आई हिमानी सावरकर यांच्या वंशावळीशी संबंधित नाही.