कर्जत : राज्याच्या राजकारणात पवार व विखे घराण्यातील परंपरागत वितुष्ट प्रसिद्ध आहे. या घराण्यातील युवा पिढीमध्ये नुकताच संसदेत रंगलेला वादविवादही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून राज्यभर गाजला. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे व राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज पालखी सोहळय़ासाठी एकत्र आले. दोघात संवादही रंगला, नंतर आ. पवार हे आ. विखे यांना सोडवण्यासाठी वाहनापर्यंत गेले, त्यांच्यात हस्तांदोलनही झाले. या भेटीने भाविकांसह दोन्ही बाजूच्या समर्थकात जोरदार चर्चा रंगल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भेटीला साक्षीदार होते आमदार पवार यांच्याकडून पराभूत झालेले भाजप माजी मंत्री राम शिंदे. कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज पालखी सोहळय़ासाठी तिघेही नेते एकत्र आले होते. आ. पवार पालखीसमवेत मंदिरापासून बाहेर काही अंतरावर थांबले होते. त्याचवेळी आ. विखे व राम शिंदे दर्शनासाठी आले. ते थेट मंदिरात गेले.

याची माहिती आ. पवार यांना मिळताच ते स्वत: मंदिराजवळ आले आणि आ. विखे यांची मंदिराबाहेर वाट पाहत थांबले. विखे येताच पवार यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली व पालखी सोहळय़ाची माहिती त्यांना दिली. त्यानंतर दोन्ही नेते बोलत विखे यांच्या वाहनापर्यंत गेले. विखे यांना वाहनात बसवून पवार परत पालखी सोहळय़ाकडे आले.

गेल्याच महिन्यात संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यामध्ये वादंग झाले. त्यानंतरही या अनुषंगाने दोन्ही बाजूंकडून परस्परांवर टीकास्त्र सोडले गेले. या पार्श्वभूमीवर आ. विखे व आ. पवार यांच्यामध्ये झालेला संवाद नेमका काय होता, याविषयी दोघांच्याही समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil rohit pawar meet in karjat zws
First published on: 23-02-2022 at 00:41 IST