राहाता : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून आगामी काळात शिर्डी नगरीचे रूपांतर अध्यात्मिक काॅरीडाॅरमध्ये करावे लागणार आहे. स्थानिक नागरिक आणि भाविकांसाठी अधिकच्या सुविधा निर्माण करून देतानाच, पर्यटनातून रोजगार निर्मिती हाच प्राधान्यक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांच्या उपस्थितीत शिर्डी शहरातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांची मतं जाणून घेण्यात आली.
बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, भाजपाचे राजेंद्र गोंदकर, शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिवसेनेचे विजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब कोते, रमेश गोंदकर, नीलेश कोते, अलका शेजवळ, अनिल शेजवळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विखे यांनी नगरपंचायत ते नगर परिषदेच्या झालेल्या प्रवासाचा विस्ताराने उल्लेख करून काळाच्या ओघात शहराची लोकसंख्या वाढली. साईबाबांच्या नगरीत येणारी भाविकांची संख्याही वाढली. भविष्याचा विचार करून शहराचा विकास अधिक नियोजनाने करावा लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशातील सर्वच अध्यात्मिक नगरीचे स्वरूप बदलत आहे. त्याच धर्तीवर शिर्डीची ओळख एक अध्यात्मिक नगरी होण्यासाठी आपला प्रयत्न आहे. राज्य सरकारचे सहकार्यही यास मिळणार असून, विविध विकास प्रकल्प कार्यान्वित करून इथले अध्यात्मिक पर्यटन वाढविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे विखे म्हणाले.
मध्यतंरीच्या काळात शहरातील गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळेच परिस्थीती बदलली. अध्यात्मिक नगरी अशीच ओळख शहराची राहावी, असा प्रयत्न असून, येणाऱ्या भाविकांसाठी थीम पार्कचा प्रकल्प उद्योजकांच्या भागीदारीने कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवली तर मोठे यश आपलेच आहे. विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी केलेल्या चांगल्या कामामुळे ऐतिहसिक विजय मिळाला. राज्यातही महायुतीचे सरकार आले. जनतेच्या मनातील सरकार असल्याने सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय होत आहेत. एकही योजना राज्य सरकारची बंद झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कैलास कोते, अभय शेळके, विजय जगताप, शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर, रवींद्र गोंदकर यांनी मनोगत व्यक्त करून निवडणुकीच्या दृष्टीने सूचना केल्या.
शिर्डीत नव्याने सुरू होत असलेल्या औद्यगिक वसाहतीमध्ये उद्योजक येवू लागल्याने मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. संरक्षण विषयक उत्पादनाची सुरुवात फेब्रुवारीमध्ये होणार असून, प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना इथे संधी आहे. टाटा उद्योग समूह प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. शासकीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन २ नोव्हेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.
