कर्जत: प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी आमदार बच्चू कडू यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर केल्यानंतर आता विखेसमर्थकही आक्रमक झाले असून, भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
बच्चू कडू यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद येथे उमटले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सोनमाळी यांच्यासह विखे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीस दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत सोनमाळी यांनी केली. बच्चू कडू यांना अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
या वेळी बोलताना सोनमाळी म्हणाले, ‘राधाकृष्ण विखे कुटुंब तीन पिढ्यांपासून समाजकारणात कार्यरत आहे. त्यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जयोजना सुरू करण्याचे श्रेयही विखे पाटील यांना जाते. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जयोजना त्यांनी सुरू केली. शेतकऱ्यांच्या खतांसाठी राहणाऱ्या लागणाऱ्या रांगा कमी केल्या. अतिवृष्टी काळात सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे राज्यातले ते पहिले मंत्री आहेत.
विखे यांनी त्यांच्या भाषणात कर्ज काढून निवडणुका लढवू नका, कारण ते पैसे विनाकारण वाया जातात आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार, अशा पद्धतीचे ते वक्तव्य कार्यकर्त्यांसाठी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली. मात्र, त्यांच्या भाषणाचा बच्चू कडू यांनी चुकीचा अर्थ लावला.
राधाकृष्ण विखे हे संयमी नेते म्हणून ओळखले जातात. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनही विखे यांनी संवेदनशीलतेने हाताळून सामाजिक समन्वय राखला. या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी केला. तो निष्फळ ठरल्याने विखे यांच्यावर ते आरोप करत आहेत, असेही सोनमाळी म्हणाले.
