महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. ते आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविली जात होती. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये औपचारिकपणे त्याची घोषणा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीत सामील होण्याचा निर्णय़ घेतला. त्यानंतर शेतकरी संघटना काय करते, याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले होते.
पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील म्हणाले, गेली दहा वर्षे आम्ही शिवसेना-भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. मात्र, शेतकऱयांच्या प्रश्नावर त्यांची भूमिका योग्य नाही. शेतकऱय़ांच्या प्रश्नावरून सरकारला जाब विचारण्याचे काम या दोन्ही पक्षांनी केलेले नाही. त्यामुळेच गेल्यावर्षी आम्ही बीडमध्ये परिषद भरवून भाजप-शिवसेनेचा पाठिंबा काढण्याची सक्त ताकीद दिली होती. आम आदमी पक्ष हा कोणत्या पुढाऱयाचा पक्ष नाही. चळवळीतून आणि स्वतःच्या ताकदीवर पुढे आलेले नेते या पक्षात आहेत. त्यामुळेच आम्ही या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही आम आदमी पक्षाचा कार्यक्रम राबविणार आहोत.