नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक
राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यात नांदेडचाही समावेश करण्यात आला. विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण राज्य निवडणूक आयोगाने नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने उद्या राहुल यांच्या नांदेड दौऱ्यात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ वाढविला जाईल. अन्य पक्षांच्या तुलनेत काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे.
खासदार राहुल गांधी हे अनेक वर्षांनंतर नांदेडमध्ये येत असल्याने त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमातून काँग्रेसच्या निवडणुकीचा तयारी करण्यात आली आहे. नांदेडची महानगरपालिकेची निवडणूक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने पक्षाने सारी ताकद या ठिकाणी लावली आहे. एकूण ८१ जागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करतानाच काँग्रेसने जवळपास २० जणांची पहिली यादी तयार केली आहे.
काँग्रेस पक्षाने प्रचारात आधीपासूनच आघाडी घेतली असली तरी सध्याच्या महापालिकेत संख्याबळात दुसऱ्या स्थानावर असलेली शिवसेना पक्षफुटीमुळे बेजार आहे तर दुसऱ्या बाजूला मनपात शत-प्रतिशत सत्तेचा ध्यास बाळगणाऱ्या भाजपत जुने विरुद्ध नवे या वादाचे तरंग असताना राहुल गांधी व इतर नेत्यांच्या आगमनाचे औचित्य साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक वातावरणनिर्मितीत आघाडी घेतल्याचे चित्र येथे तयार केले.
गेल्या काही मनपा निवडणुकांत काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत झाला ; पण यंदा भाजपने ‘दिल्लीत कमळ, राज्यात कमळ आणि आता नांदेडमध्येही कमळ..’ असा संकल्प सोडल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी काँग्रेसने केली. त्यातच पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दौरा निश्चित झाल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या उत्साहाला भरते आले आहे.
भाजपने नांदेडमध्ये चालवलेल्या प्रयोगाची खिल्ली उडवली. या पक्षात स्थानिक जुन्या व नव्या नेत्यांचा वरचष्मा असताना पक्षाला दुसऱ्या पक्षाच्या आमदाराचा टेकू घ्यावा लागतो, यातून त्यांचा दुबळेपणा दिसतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
राहुल गांधी नांदेडच्या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नंतर येथून मोटारीने परभणीला जाताना रस्त्यात काही ठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधी यांचा केवळ परभणीचा दौरा ठरला होता. पण अशोक चव्हाण यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नांदेडची भर घातली. २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी नांदेडमध्ये झालेल्या सभेत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सत्ता आल्यावर अशोक चव्हाण हेच मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली होती व त्याचा अशोकरावांना जिल्ह्य़ात चांगलाच फायदा झाला होता. जिल्ह्य़ात काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.