शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटातील ४० आणि ठाकरे गटातील १४ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला सुरूवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वत: ही सुनावणी घेणार आहेत. प्रत्येक आमदारांचं मत जाणून घेतल्यानंतर राहुल नार्वेकर अपात्रतेबाबत आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

येत्या १४ सप्टेंबर रोजी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांची सुनावणी होणार आहे. यासाठी सर्व आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा : “भाजपाला गाफील ठेवून शरद पवार यांनी घात केला”, मंत्र्याचा थेट हल्लाबोल

याबाबत ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक बोलताना म्हणाले, “गुरुवारी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीच्या नोटीशींना आम्ही लेखी उत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर ठरवला होता. तरीही, आम्हाला त्रास दिला गेला.”

“पहिल्यांदा १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी होती. ती न करता बाकींच्या आमदारांना त्रास देण्यासाठी नोटीसा पाठवून हजर राहण्यासाठी सांगण्यात येत आहे. पण, हजर राहत आमचं मत मांडू,” असं वैभव नाईक यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात गेले नाही, आता…”, अजित पवार गटातील आमदाराची टीका

यावर राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “घटनेतील तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे. सर्व आमदारांना मत मांडण्याची संधी दिली जाईल. सुनावणी झाल्यानंतर निर्णय घेऊ,” असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.