हर्षद कशाळकर

अलिबाग- किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी राज्यसरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असला तरी, भारतीय पुरातत्व विभागाकडून किल्ला जतन व संवर्धनाचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. १९ पैकी केवळ २ कामेच विभागाने पूर्ण केली असून असून, साडे आठ कोटींचा निधी वापरा विना पडून आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.

हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडाच्या जतन व संवर्धनासाठी राज्यसरकारने साडे सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धना बरोबरच या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास या कार्यक्रमा आंतर्गत केला जाणार आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना राज्यसरकारने केली आहे. रायगड साठी बांधकाम विभागाचे विशेष स्थापत्य पथक नेमण्यात आले आहे. जेणेकरून किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करता येणार आहे. पण तरीही गड जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या कामांना गती मिळू शकलेली नाही.

कार्यकारी अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड यांच्या माध्यमातून सन २०१६ ते सन २०२३ पर्यंत एकूण १११ कामांना मंजूरी देण्यात आली होती. यापैकी केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे सध्या सुरू आहेत. २३ कामांना अद्याप सुरवातही होऊ शकलेली नाही. किल्ला संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व विभागामार्फत केले जात आहे. यासाठी त्यांना ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गड संवर्धनाच्या १९ कामांना मंजूरी मिळाली आहे. यापैकी केवळ दोन कामे पुर्ण झाली असून, १२ कामे प्रगतीपथावर आहेत. ४ कामांना अद्याप सुरवात झालेली नाही. महत्वाची बाब म्हणजे पुरातत्व विभागाकडे प्राप्त झालेल्या ११ कोटींच्या निधी पैकी केवळ २ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी खर्च झाला असून साडे आठ कोटींचा निधी पुरातत्व विभागाकडे शिल्लक आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने कामाची गती वाढविण्यासाठी जादा मनुष्यबळ लावण्याची गरज आहे.

त्यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पावसाळ्यात रायगड खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या कालावधीत कामे करणे शक्य होत नाही. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मे या कालावाधीत प्रत्यक्ष कामे करता येतात. त्यामुळे मे अखेर पर्यंत जास्तीत जास्त कामांना गती देण्याचा प्रय़त्न करणे आवश्यक आहे. किल्ले रायगडावर यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. २ जून ते सहा जून दरम्यान तिथी आणि तारखे नुसार या सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे. त्यापुर्वी गड संवर्धनाची कामे नेटाने गती देऊन पुर्ण करणे गरजेचे असणार आहे.

भूसंपादन कामाची स्थिती….

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा विकास, महामार्गाच्या कामांसाठी एकूण ३६ हेक्टर क्षेत्र संपादीत केले जाणार आहे. यापैकी ३१.५६ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आले आहे. साडे तीन हेक्टर क्षेत्र संपादीत होणे बाकी आहे. भुसंपादनासाठी २१ कोटी १८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. यापैकी १९ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आला आहे. १.६१ कोटींचे वितरण अद्याप शिल्लक राहीले आहे.

महावितरण मार्फत केल्या जाणाऱ्या कामांची स्थिती….

महावितरण मार्फत रायगड किल्ल्यावर तसेच लगतच्या परिसरात उच्च दाब, लघुदाब वीज वाहिन्या आणि रोहीत्र टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ६ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकील ४ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी खर्च झाला असून १ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. या आंतर्गत २ किलोमीटर लांबीच्या उच्चदाब वाहिन्या टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. ५ रोहीत्र बसविण्याचे कामही पुर्ण झाले आहे. लघूदाब वाहिन्या टाकण्याच ८.४० किमीच्या कामापैकी ५,९३ किमीचे काम पुर्ण झाले आहे.

किल्ला जतन करण्याची कामे हे कौशल्यपुर्ण पध्दतीने होणे अपेक्षित आहे. गडाच्या मुळ ढाच्याला धक्का न लावता ही कामे करावी लागणार आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाची अखत्यारीत असलेल्या कामे घाईगडपडीत होऊ शकत नाहीत. त्याला योग्य वेळ द्यावा लागेल. पण जास्त मनुष्यबळ लावून कामाची गती वाढवा यासाठी पाठपुरावा करता येईल- रघुजीराजे आंग्रे, सदस्य रायगड प्राधिकरण.

गडावरील संवर्धनाची कामे संथ गतीने सुरु आहेत. त्या कामांचा वेग वाढवायला हवा. गडावर झालेल्या उत्खननात काय सापडले याचे अहवाल पुरातत्व विभागाने प्रसिद्ध करायला हवेत. ज्या अहवालांचा फायदा इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना होऊ शकेल. एकही अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला नाही. गडसंवर्धनाच्या कामाचा वेग वाढायला हवा.-डॉ. अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक