दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात उद्या (गुरुवारी) मराठवाडय़ातील खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाडय़ातील रेल्वेविषयक विविध मागण्यांबाबत कोणी आवाज उठविणार काय, असा सवाल केला जात आहे.
मराठवाडय़ातील सर्व खासदारांच्या बैठकीचे आयोजन नांदेडच्या रेल्वे डिव्हिजन कार्यालयात होत आहे. ही बाब दिलासा देणारी असली, तरी रेल्वे प्रवाशांच्या खूप अपेक्षा आहेत व त्या वर्षांनुवर्षे पूर्ण होत नाहीत. त्याला जबाबदार कोण, हा सवाल आहे. रेल्वेचे सिकंदराबादचे सरव्यवस्थापकही बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठकीतून होणाऱ्या निर्णयाकडे मराठवाडय़ातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
जनरल रेल्वे मॅनेजर व डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर सध्या पोस्टमनची भूमिका वठवत आहेत काय, अशी चर्चा अलीकडे होत आहे. केवळ शिफारशी रेल्वे बोर्डाकडे पाठविणे एवढेच त्यांचे कार्य उरले आहे. धर्माबाद रेल्वेस्थानकाला चार एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ांना थांबा देण्याची शिफारस जनरल रेल्वे मॅनेजर (मुख्य कार्यालय) सिकंदराबाद कार्यालयाने गेल्या ४ मार्चच्या पत्राद्वारे नवी दिल्ली रेल्वे बोर्ड इंटर टाइम टेबल कमिटीकडे केली. त्यामध्ये थांब्यासाठी गाडी क्र. १८३०९/१० नांदेड-संबलपूर, १८५०९/१० नांदेड-विशाखापट्टणम, १७२१३/१४ नगरसोल-नरसापूर व हैदराबाद-अजमेर (१२७१९/२०) धर्माबाद स्टेशनला थांबा देण्याची मुख्यत्वे शिफारस आहे. परंतु एक वर्षांपासून रेल्वे जनरल मॅनेजरच्या शिफारशीचा फायदा काहीही झाला नाही. तसेच रेल्वे बोर्डाकडून ही एक्स्प्रेस गाडय़ांच्या थांब्याबाबत कुठलीच कार्यवाही नाही.
नांदेड-संबलपूर, नांदेड-विशाखापट्टणम व नगरसोल-नरसापूर या सर्वसाधारण एक्स्प्रेस गाडय़ा नांदेडहून रिकाम्या धावतात. त्यामुळे मराठवाडय़ाच्या जनतेला त्याचा काय फायदा? वस्तुत: या गाडय़ा धर्माबाद, उमरी, मानवत, सेलू, पाथरी (नगरसोल एक्स्प्रेस) या सर्व तालुक्यांच्या ठिकाणी थांबावयास हव्यात, अशी मागणी होत आहे.
नांदेड डिव्हिजन मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहे. धर्माबाद ते मुदखेडपर्यंतचा रेल्वेमार्ग नांदेड डिव्हिजनला जोडण्याचा विचार करू, म्हणून माजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांनी १६ एप्रिल १९९९च्या पत्राद्वारे धर्माबादच्या शिष्टमंडळास लेखी कळविले होते. परंतु मागील १६ वर्षांपासून त्यावरही कोणतीच कार्यवाही नाही.
मराठवाडय़ाचे व्हिजन
मराठवाडय़ाचे व्हिजन म्हणून डबल गेज करण्यात यावे. नव्याने रेल्वेच्या मागण्यांत मुदखेड-मनमाड (३७९ किमी), मुदखेड-सिकंदराबाद (बोलाराम-२४५ किमी), मुदखेड-अदिलाबाद (१६२ किमी), पूर्णा-खांडवा (४८३ किमी) व परभणी-पंढरपूर (१२७ किमी) यांचे डबल गेजमध्ये रूपांतर २०१५-१९ या कालावधीत करण्याचे ‘व्हिजन’ असले पाहिजे. लहान गेटचे रूपांतर भूमिगत पुलात होत आहे. त्याचबरोबर तालुक्याच्या शहरातील सर्व रेल्वे गेटवर ओव्हरब्रीज होणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट विक्रीची सुविधा मिळणे आवश्यक आहे. तिरुपती-औरंगाबाद, ओखा-रामेश्वरम (०७४०५/०६, १६७३३/३४) या तीर्थक्षेत्राला धावणाऱ्या गाडय़ांचा थांबा मराठवाडय़ातील तालुक्याच्या रेल्वेस्थानकाला मिळवून देण्याच्या अपेक्षा आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
मराठवाडय़ाच्या रेल्वेला गती मिळणार की नाही?
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात उद्या (गुरुवारी) मराठवाडय़ातील खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाडय़ातील रेल्वेविषयक विविध मागण्यांबाबत कोणी आवाज उठविणार काय, असा सवाल केला जात आहे.

First published on: 08-01-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway in marahtwada