मोसमी पाऊस राज्यात दाखल; सोमवापर्यंत सर्वदूर

मृग नक्षत्राला प्रारंभ होतानाच शुक्रवारी नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आनंदघन मोठय़ा दिमाखात महाराष्ट्राच्या अंगणी दाखल झाले आहेत. त्यामुळे बळीराजासह  सर्वच जण सुखावले आहेत. राज्यात दाखल झालेल्या मोसमी पावसाने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भाग व्यापला असून, रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंत त्याने धडक दिली आहे. पुढील वाटचालीस पोषक वातावरण असल्याने शनिवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये, तर सोमवापर्यंत तो राज्यात सर्वदूर पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोसमी पाऊस साधारणत: ७ जूनला महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो. यंदा नियोजित वेळेच्या एक दिवस उशिराने तो राज्यात दाखल झाला आहे. केरळमध्ये नियोजित वेळेच्या तीन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनने महाराष्ट्रापर्यंत येण्यात अकरा दिवसांचा कालावधी घेतला. अंदमान ते केरळ आणि त्यानंतर कर्नाटकपर्यंतचा त्याचा प्रवास वेगवान होता. मात्र, मध्यंतरी तीन ते चार दिवस तो केरळमध्येच रेंगाळल्याने त्याची वाटचाल काहीशी संथ झाली होती. सध्या त्याच्या वाटचालीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तळकोकणमार्गे राज्यात दाखल होताच त्याने विस्तारण्यास सुरुवात केली आहे.

मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने सध्या विविध भागात जोर धरला आहे. मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळत आहेत. गुरुवारपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह कोकणात दमदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिलतील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती, मुळशी तालुक्यांमध्ये वादळी वारे, जोरदार पावसाने चारापिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, नांदेडमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात पाऊस

गोव्यासह राज्यातील कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ९ जूनला काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातही काही ठिकाणी चांगला पाऊस होईल. त्याचप्रमाणे १० ते १२ जून या कालावधीत कोकण आणि राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.