राज्यभरात सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या तडाखेबाज पावसाने कोंढवा येथील भिंत दुर्घटनेची पुनरावृत्ती मुंबई, कल्याण आणि पुण्यातच पुन्हा केली असून या ‘मृत्यूच्या भिंती’ने ३१ जण दगावले आहेत. त्याचबरोबर नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून चार मजूर दगावले, मुंबईत पाण्यात बुडून दोघे तर विजेचा धक्का लागल्याने एकजण दगावला आहे. यामुळे राज्यभरातील एकूण पाऊसबळींची संख्या ३८वर गेली आहे.
पावसाचा सर्वाधिक तडाखा राजधानी मुंबईला बसला असून मुंबईतील महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या नियोजनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. रस्तोरस्ती साचणाऱ्या पावसाचा निचरा करण्याची कोणतीही सक्षम यंत्रणा ‘२६ जुलै’चा फटका बसलेल्या या शहरासाठी पालिका किंवा सरकारला उभारता आलेली नाही, हे या पावसाने पुन्हा एकवार दिसून आले. उलट पावसाच्या माऱ्यापुढे शरणागती पत्करून मुंबईसह तीन जिल्ह्य़ांत सुट्टी जाहीर करून दैनंदिन कारभार गुंडाळणे राज्य सरकारलाही भाग पडले. गेल्या ४५ वर्षांत असा पाऊस झाला नाही, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण यंत्रणांची सारी सज्जताच या पावसाने धुऊन टाकली.
मुंबईचा मंगळवारचा दिवस शोकवार्ता घेऊनच उजाडला. पश्चिम उपनगरात मालाड-पूर्व येथील पिंपरीपाडा येथील महापालिकेच्या जलाशयाची भिंत पाण्याच्या लोंढय़ाबरोबर झोपडपट्टीवर कोसळली आणि झोपेत असलेल्या सात बालके व सहा महिलांसह २१ जणांचा मृत्यूने घास घेतला. या दुर्घटनेत सुमारे ७५ जण जखमी झाले आहेत. कल्याणमधील दुर्गाडी पुलाजवळील एका शाळेच्या आवाराची भिंत नजीकच्या बेकायदा झोपडय़ांवर कोसळून सोमवारी मध्यरात्री दीड वाजता झालेल्या दुर्घटनेत तीन रहिवासी जागीच ठार, तर एक रहिवासी गंभीर जखमी झाला. पुण्यात कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. या दु:खाचे कढ ओसरण्याआधीच पुन्हा एकदा सोमवारी रात्री आंबेगाव भागात सिंहगड इन्टिटय़ूटच्या परिसरातील सीमाभिंत कोसळून सहा बांधकाम मजूर मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्व मजूर छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातील होते.
गंगापूर रस्त्यावरील ध्रुवनगर परिसरात सुरू असलेल्या गृहप्रकल्पात मंगळवारी सकाळी मजुरांसाठीची पाण्याची टाकी कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून हे सर्व पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा राज्यातील आहेत.
मुंबईतील मालाड सबवे येथे सोमवारी संध्याकाळपासून साचलेल्या पाण्यात अडकलेल्या एका स्कॉर्पियो मोटारीत गुदमरून दोघांचा करुण अंत झाला, तर विलेपार्ले येथे विजेच्या धक्क्य़ाने एका २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी दिवस डोक्यावर येताना पावसाने काहीशी विश्रांती घेतली, तरी रात्रीच्या भयाचे सावट मात्र दिवसावर दाटलेलेच राहिले.