भातलावणी अखेरच्या टप्प्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी : यंदाच्या वर्षी बऱ्याच उशीराने आगमन झालेला मान्सूनचा पाऊस आता कोकणात चांगलाच स्थिरावला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यंमध्ये या पावसाने सरासरी एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे.

‘वायू’ चक्री वादळामुळे मान्सूनच्या वाटचालीत अडथळा निर्माण केल्यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस कोकणात पोचण्यास जूनचा तिसरा आठवडा उजडला. पण त्यानंतर काही दिवस वगळता हा पाऊस सर्वत्र चांगल्या प्रकारे पडत असून या महिन्याच्या सुरवातीपासून त्याने चांगलेच बस्तान बसवले आहे. दरवर्षी जूनअखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी १ हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो. पण यावर्षी ७ जुलै उजाडला. १ जूनपासून त्या दिवसापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी १०५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी राजापूर (१३५५ मिमी) मंडणगड (१३११), संगमेश्वर (१११६), लांजा (११००), चिपळूण (१०३४) आणि दापोली (१०१३ मिमी) या ६ तालुक्यांमध्ये त्यापूर्वीच १ हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ जुलै रोजी हा टप्पा गाठला गेला. त्या दिवसापर्यंत तेथे एकूण सरासरी १०१९ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर गेले काही दिवस या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडत असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली.

रत्नागिरी शहर व परिसरात गेले दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून वादळी वारेही वाहत आहेत. गुरूवार सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात एकूण सरासरी ८६.८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून खेड तालुक्यात सर्वात जास्त, (१४१ मिमी) पाऊस पडला. त्या खालोखाल संगमेश्वर (१२३), दापोली (११६), चिपळूण व लांजा (प्रत्येकी ९३ मिमी), मंडणगड (६७) आणि रत्नागिरी (५४ मिमी) याही तालुक्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली. तसेच गेल्या १ जूनपासून ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी १२७७.११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात एकूण सरासरी तब्बल १८५५.७२ मिलमीटर पाऊस कोसळला होता. त्याचबरोबर तालुकावार सरासरीमध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी मंडणगड तालुका आघाडीवर (१७१४ मिली) असून राजापूर (१५१४), संगमेश्वर (१३९८), लांजा (१३०१), चिपळूण (१२७९), दापोली (१२४९)आणि खेड (१२०१ मिली) याही तालुक्यांनी चांगली सरासरी गाठली आहे. गुहागर (९५९) व रत्नागिरी (८७९ मिली) हे दोन तालुके मात्र त्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहेत.

शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवार सकाळपर्यंतच्या २४ तासात एकूण सरासरी ७३ मिलीमीटर पाऊस पडला असून जिल्ह्याच्या ८ तालुक्यांपैकी वेंगुर्ले तालुक्यात सर्वात जास्त, (१२९ मिली) पाऊस पडला आहे. त्या खालोखाल दोडामार्ग (११३), कुडाळ (८६), सावंतवाडी (६८), कणकवली (६७) आणि वैभववाडी (५७ मिली)याही तालुक्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली.  त्याचबरोबर १ जून ते ११ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण सरासरी १२७५.०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सावंतवाडी (९१२ मिली) वगळता उरलेल्या आठही तालुक्यांमध्ये या कालावधीत सरासरी १ हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यातही वैभववाडी (१५०३ मिली), कणकवली (१४८९) आणि दोडामार्ग (१४१० मिली) या तीन तालुक्यांनी चांगली आघाडी घेतली आहे.

या दोन जिल्ह्यांमध्ये सध्या पडत असलेला हा पाऊस भातशेतीसाठी अतिशय उपयुक्त असून लावणीच्या कामाने सर्वत्र वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी हे काम अंतिम टप्प्यात असून यापुढे काही काळ पावसाने उसंत घेतली तर रोपांच्या वाढीसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall in ratnagiri sindhudurga crossed the average of 1000 mm zws
First published on: 12-07-2019 at 03:04 IST