​सावंतवाडी: यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं वेळापत्रक बिघडलेलं असलं, तरी भातशेतीचं मोठं नुकसान झालेलं नाही, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात एकूण १.७९ हेक्टर भातशेती बाधित झाली आहे. कृषी सल्लागार अरुण नातू यांनी या नुकसानीची माहिती दिली.

​जिल्ह्यातील आठपैकी चार तालुक्यांमध्ये भात पिकाचं किरकोळ नुकसान झालं आहे. यात देवगड, मालवण, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांचा समावेश आहे.

​यंदा पावसाचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांनी भात शेतीची कामं वेळेवर केली. शेतीची कामे सुरू असताना पाऊस चांगला होता, मात्र आता पीक काढणीच्या वेळी मुसळधार पाऊस येत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झालं आहे.

​तालुकानिहाय नुकसानीचा तपशील:

​देवगड: एका गावात एका शेतकऱ्याचं १५ गुंठे क्षेत्र बाधित झालं.

​मालवण: तीन गावांमध्ये सहा शेतकऱ्यांचं १.३५ हेक्टर क्षेत्र बाधित झालं.

​सावंतवाडी: दोन गावांमध्ये दोन शेतकऱ्यांचं १३ गुंठे क्षेत्र बाधित झालं.

​दोडामार्ग: एका गावात एका शेतकऱ्याचं १६ गुंठे क्षेत्र बाधित झालं.

​या चार तालुक्यांमध्ये एकूण सात गावांतल्या दहा शेतकऱ्यांचं १.७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे.

​कणकवली, वैभववाडी, कुडाळ आणि वेंगुर्ला या चार तालुक्यांमध्ये भातशेतीचं कोणतंही नुकसान झालेलं नसल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे. जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून आलेल्या अहवालानुसार, भातशेतीचं नुकसान किरकोळ स्वरूपाचं आहे, असं कृषी सल्लागार अरुण नातू यांनी सांगितलं. दरम्यान भात पीक परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पावसाने उघडीप साधल्याने काही प्रमाणात किड प्रादुर्भाव झाला तर दाणे तयार झाले असताना लोंब्या जमिनीवर भिडल्या असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कृषी विभागाने सर्वेक्षण योग्य प्रकारे केले नाही त्यामुळे हे चित्र समोर आले नाही असे एक शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी बोलताना सांगितले.