कर्जत : तालुक्यातील विविध भागांमध्ये बुधवारी सकाळी पाऊस पडला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यामध्ये पडलेल्या या पावसाने खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडलेला असताना आज पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

या वर्षी कर्जत तालुक्यामध्ये खरीप पिकांमध्ये बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, कांदा, कापूस यासह विविध चारा पिके यांची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी करण्यात आली आहे. पेरणीनंतर ही सर्व पिके अतिशय जोमाने उगवून आली आहेत. मागील काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे बळीराजा धास्तावला होता. मात्र तालुक्यातील काही भागांमध्ये आज सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही परिसरात तर पिकांचे एक भरणे झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यामुळे या परिसरातील पिकांना जीवनदान मिळाले आहे. जर आजचा पाऊस पडला नसता, तर तालुक्यातील अनेक भागांतील खरीप पिके पाण्याअभावी जळाली असते.

मागील अनेक वर्षांपासून कर्जत तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याची दिसून येते. तालुक्यामध्ये खरीप पिकांसाठी सरासरी एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र लागवडीखाली आणण्यात येते. उन्हाळ्यातील मे महिन्याच्या शेवटी तालुक्यात जोरदार पाऊस झाला आणि या पावसानेच तालुक्याची सरासरी गाठली. मात्र त्यानंतर कुठेही जोरदार व नियमित पाऊस पडला नाही. खंडित पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट होऊ शकते, अशी माहिती कृषी कार्यालयामधून देण्यात आली आहे.

तालुक्यामध्ये मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर तत्काळ पेरण्या केल्या जातात या वर्षी मृग नक्षत्राचा पाऊस फारसा नाही पडला. तरीदेखील तालुक्यातील अनेक भागांमध्ये पेरण्या करण्यात आल्या.

कापसाचे पीक हद्दपार होणार काय?

या वर्षी कर्जत तालुक्यामध्ये कापूस व सूर्यफूल यांच्या पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे खरिपाच्या पेरणीची टक्केवारी घसरल्याचे पहावयास मिळते. तालुक्यामध्ये कापूस सात हजार हेक्टरमध्ये सरासरी पेरला जातो असा अंदाज आहे; मात्र, प्रत्यक्षात या वर्षी कापसाचे क्षेत्र अवघे १४०० हेक्टर प्रत्यक्षात पेरणी झालेली दिसून येते. कापसाच्या क्षेत्रामध्ये अचानक घट झाल्यामुळे तालुक्यातून कापूस हद्दपार होणार काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाव कमी व मजुरीचे दर वाढले

कापूस पिकामध्ये घट होण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे इतर पिकांच्या तुलनेमध्ये कापसाचा दर हा नेहमीच कमी मिळत आहे आणि मागील काही वर्षांपासून तो सातत्याने कमी होत आहे. कापसाचे उत्पादन जरी चांगले मिळत असले, तरी इतर पिकांच्या तुलनेमध्ये कापूस पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढल्याचे दिसून येते. खास करून कापूस वेचण्यासाठी आता मजूर उपलब्ध होत नाही. पूर्वी रोजंदारीवर मजूर मिळत होते; मात्र आता मजूर कापूस वेचण्यासाठी किलोवर मजुरी मागत आहेत. यामुळे शेतकऱ्याला ते परवडत नाही. खरीप पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन भावही चांगला मिळत असल्यामुळे तालुक्यामध्ये कापसाच्या ऐवजी अनेक शेतकरी उडीद व तूर या पिकांकडे वळल्याचे पहावयास मिळते. तसेच चारा पिकाचे प्रमाण दूध व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचेदेखील दिसून येत आहे. या वर्षी चारा पिकामध्ये विक्रमी पेरणी झाली आहे.

तालुक्यामध्ये एक लाख एक हजार पंचवीस हेक्टर क्षेत्र सरासरी पेरणीसाठी असते. या वर्षी ७८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात पेरणी झाली आहे म्हणजे सरासरीच्या ७७ टक्के पेरणी या वर्षी तालुक्यामध्ये झाली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फळबागांची लागवडदेखील मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे, असे दिसून येते. यामध्ये खरीप पिकांच्या पेरणीची सरासरी कमी झाल्याचे प्रामुख्याने दिसून येते. तालुक्यात या वर्षी पेरणी झालेल्या खरीप पिकांची आकडेवारी खालीलप्रमाणे : बाजरी – ३३२९ हेक्टर, मका १७८७० हेक्टर, तूर १२१९५ हेक्टर, मूग ११८५ हेक्टर, उडीद २१२०६ हेक्टर, कांदा १६२९ हेक्टर, ऊस १०७०० हेक्टर, चारा पिके ६६२१ हेक्टर, भाजीपाला ७०४ हेक्टर, फळपिके ७५० हेक्टर.