शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परब आणि संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मागच्या तीन महिन्यांतली ही चौथी भेट आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जातं आहे. दरम्यान याबाबत आता मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

“ठाकरे बंधू आज एकत्र आले याचा मला आनंद आहे. दोन महिने झाले असतील मी म्हटलं होतं की महाराष्ट्र हितासाठी या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. ते एकत्र नाही आले तर इतिहास त्यांना माफ करणार नाही. माझ्या स्पष्ट बोलण्याचा मला त्रास झाला, प्रायश्चित्तही घ्यावं लागलं. दोन भावांमध्ये संवाद निर्माण झाला आहे ही चांगली गोष्ट आहे.” असं प्रकाश महाजन म्हणाले.

दसरा मेळाव्यात दोन भाऊ एकत्र आले तर…

दसरा मेळाव्याला दोन भाऊ एकत्र आले तर खूप बरं होईल. माझीही तशी इच्छा आहे. महाराष्ट्राची ती इच्छा आहे असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. शिवाजी पार्क या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंची समाधी आहे. जर दसरा मेळाव्यात दोन भाऊ एकत्र दिसले तर बाळासाहेबांना आणि महाराष्ट्राला किती आनंद होईल? याचा विचार तुम्हीच करा असं प्रकाश महाजन म्हणाले. काही वेळापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

गणेश उत्सवातही उद्धव ठाकरे पोहचले राज ठाकरेंच्या घरी

यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवतीर्थवर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यादेखील शिवतीर्थवर गेल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी भोजनचा आस्वादही घेतला होता. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे ठाकरे बंधू हे वेगाने एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आणखी वाढली आहे. आता नेमकं काय होणार ते येत्या काळात स्पष्ट होईल.

किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलं आहे?

सत्ताधारी हे महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरत आहेत. आता दोन बंधू जर या सगळ्याला तोंड देण्यासाठी एकत्र येत असतील तर त्यात काय चुकीचं काय? मुख्य प्रवाहातले नेते राज ठाकरेंना भेटायला गेले आहेत. जे घडतंय ते चांगलंच घडतं आहे. मतदारांनाही आनंद झाला आहे असं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.