Raj Thackeray महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे आणि पवार या दोन आडनावांभोवती गेल्या अनेक वर्षांपासून फिरतं आहे. ठाकरे असो किंवा पवार आजच्या घडीला या दोन्ही आडनावांकडे ब्रँड म्हणूनच पाहिलं जातं. याच बाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो आहे हे सांगितलं त्याशिवाय एक बाब त्यांनी आत्मविश्वासाने नमूद केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातले आक्रमक नेते
राज ठाकरे हे महाराष्ट्रातले असे नेते आहेत ज्यांचा करीश्मा सगळ्या राज्याने वेळोवेळी पाहिला आहे. सगळ्या प्रकारची टीका आपल्या खास शैलीतून परतवून लावण्याची त्यांची आक्रमक शैली महाराष्ट्राला माहीत आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याबाबत भाष्य केलं होतं. दरम्यान अशाच एका मुलाखतीत राज ठाकरेंनी ठाकरे आणि पवार ब्रँड याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही भाष्य केलं आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
दिल्लीमध्ये जेव्हा-केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो. तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात ठाकरे आणि पवार.. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावांचा जो ब्रँड आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले, “ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे यात काही वादच नाही. पण तो ब्रँड संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता. संगीत क्षेत्राचा विचार केला तर माझे वडील म्हणजेच श्रीकांत ठाकरेंचा प्रभाव दिसून आला. त्यानंतर माझा प्रभाव आहे, उद्धवचा आहे. व्यक्तिगत प्रभाव असतो पण आडनाव महत्त्वाचं असतंच. ती गोष्ट म्हणजेच आडनाव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबई तकसाठी साहिल जोशी आणि केदार शिंदे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे विधान केलं आहे.
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही -राज ठाकरे
राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. जशी मराठी राजभाषा आहे. जशी जागतिक पातळीवर इंग्रजी ही भाषा आहे. या दोन महत्त्वपूर्ण भाषा आहेत. ज्याला हिंदी शिकायची आहे त्याने ती भाषा शिकावी. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये इतर तिसरी कोणती भाषा होती का? ज्याला हिंदी भाषा शिकावी वाटते त्याने ती भाषा शिकावी” असं म्हणत राज ठाकरेंनी हिंदी भाषेबाबत त्यांची भूमिकाही याच मुलाखतीत मांडली आहे.