ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘शिवचरित्र’कार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रुग्णालयात निधन झालं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गजानन मेहेंदळेंसाठी पोस्ट लिहिली आहे. इतिहास संशोधकाकडे तटस्थता हवी ती गजानन मेहेंदळेंकडे होती असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं काल पुण्यात निधन झालं. गजाननरावांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि अभ्यासाला सुरुवात करताच त्यांना युद्धशास्त्रात रुची निर्माण झाली.

अठराव्या वर्षापासून त्यांनी युद्धशास्त्राचे वाचन आणि अभ्यास सुरू केला. पुढे १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळेस ते एका वर्तमानपत्रासाठी युद्ध पत्रकार म्हणून गेले, तेंव्हा त्यांचं वय होतं अवघ्या २४ वर्षांचं. ग्रंथालयातील पुस्तकांमध्ये दिसणारा इतिहास आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर इतिहास घडताना पहायचं !आयुष्यात असे दोन्ही अनुभव किंवा मी तर म्हणेन भाग्यच गजाननरावांना लाभलं. युद्धाचं वार्तांकन करत असताना वास्तव जे डोळ्यांना दिसतं आणि बाहेर जे प्रसारित केलं जातं, यात किती तफावत असते आणि अनेकदा बाहेर जे पसरवलं जातं तोच पुढे इतिहास होतो हे सगळं त्यांनी अनुभवलं असणार.

इतिहास संशोधकाकडे पूर्ण तटस्थता हवी, जी गजाननरावांकडे होती. पण तटस्थततेच्या नावाखाली खूपच स्वप्नाळूपणा किंवा कोणालातरी खलनायक ठरवायचे असले प्रकार गजाननरावांनी कधी केले नाहीत. मध्यंतरी एक वाक्य वाचनात आलं, ते नक्की कुठे वाचलं ते नेमक आत्ता आठवत नाहीये पण वाक्य फार सुंदर आहे. Until the lions have their historians, tales of the hunt shall always glorify the hunter. इतिहास जेत्यांचा लिहिला जातो किंवा सांगितला जातो, पण पराजितांचं काय ? त्यात पण समजून घेण्यासारखा इतिहास लपलेला असतो, असं भान असलेले इतिहास संशोधक जवळपास नाहीसेच होत चालले आहेत.

इतिहास संशोधन करायचं म्हणून गजान मेहेंदळे अनेक भाषा शिकले

गजाननराव इतिहास संशोधन करायचं म्हणून अनेक भाषा शिकले, मोडी , फार्सी , इंग्रजी भाषा शिकले , कारण आपला इतिहास किंवा डॅाक्युमेंटेशन हे आपल्या लोकांनी फार न लिहिता इतर लोकांनीच जस्त लिहून ठेवल्यामूळे त्यांच्या भाषा शिकून ते आपल्या पर्यंत पोहोचवण्याच काम गजाननरावांनी कमालीचे केले . सोशल मीडियाच्या काळात इतिहास संशोधक म्हणवणाऱ्यांचं आज पेवच फुटलं आहे, अनेक भाषा सोडा ज्या भाषेत त्यांचं म्हणणं मांडतात त्या भाषेत पण धड व्यक्त होता येत नाही अशा काळात आपण जगत आहोत. व्हॅाट्सॲपर आलेलं काहीही खरं मानण्याच्या काळात पूर्ण आयुष्य एखाद्या विषयाच्या संशोधनाला द्यायचं हे संस्कार आता कसे होणार हा प्रश्नच आहे.

अशी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत…

माझं भाग्य आहे असं मी म्हणेन की मला लहान वयातच इतिहासाची गोडी लागली आणि अनेक इतिहास संशोधकांचा सहवास लाभला. गजाननरावांनी तर त्यांना कधीही फोन करून कुठलाही संदर्भ विचारायची मुभा दिली होती. त्यांच्याशी अनेकवेळा माझी प्रत्यक्ष भेट झाली होती. माझ्या आठवणीत गजाननराव कधी स्वस्थ बसलेत असं दिसलंच नाही. त्यांच्या घरी माझं अनेकदा जाणं व्हायचं तेंव्हा त्यांच्यासमोर कायम हस्तलिखितं असायची, पुस्तकं असायची… आणि कुठलाही संदर्भ विचारला तर, थांबा दाखवतो, म्हणत विशिष्ट संदर्भ ते समोर घेऊन यायचे, अगदी पृष्ठक्रमांकासहित. अशी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत आणि कदाचित काळाच्या ओघात नाहीशीच होतील. बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणायचे की ‘ वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात ! आमच्या गजाननरावांकडे पाहिल्यावर मला नेहमी त्या वरच्या ओळी थोड्या बदलाव्याशा वाटायच्या , की इतिहासाचं वेड लागल्या शिवाय इतिहासाकडे पाहता येत नाही आणि इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं इतिहास लिहितात !

गजाननरावांच्या इतिहास प्रेमाची प्रेरणा बाबासाहेब पुरंदरे. ते नेहमी म्हणायचे की,’ मी बाबासाहेबांच्या खांद्यावर बसून इतिहास बघितला आणि त्यानंतर इतिहासाबद्दलच प्रेम आणि कुतूहल जागृत झालं. महाराष्ट्राला विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, वा. सी. बेंद्रे, रा.चिं. ढेरे, सरदेसाई, यांच्यासारख्या इतिहास संशोधकांची परंपरा होती. महाराष्ट्राचं भाग्य असं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भरभरून लिहिणारे जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला इतिहास पण वाचता आला. मेहंदळेंसकट ही सगळी इतिहासाने झपाटलेली माणसं परत कधी होतील ? इतिहास परत परत सांगावा लागतो. आणि महाराष्ट्रासारख्या प्रांतात जिथे आपण कोण होतो आणि आपल्या क्षमता काय आहेत याचं भानच जिथे हरवत चाललं आहे अशावेळेला मेहंदळ्यांसारखी माणसं आपल्यात नाहीत. ज्यांना पटकन एक संदर्भ विचारता येईल, ज्यांच्यामुळे एक दृष्टिकोन मिळेल अशी माणसं आसपास न दिसणं हे दुर्दैव आहे. इतिहासासाठी संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकणारी माणसं भविष्यात तरी दिसू देत हीच इच्छा.

आज गजाननराव मेहंदळे आपल्यातून गेले , परंतु पुस्तकरूपी खजिना जे ते सोडून गेलेत त्यातूनच या देशातल्या , खासकरून महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळत राहो हीच आशा आणि अपेक्षा !

गजाननरावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली !

राज ठाकरे

अशी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे. शिवचरित्र या विषयावर गजानन मेहेंदळे व्याख्यानही देत असत. शिवाजी महाराजांना इतिहासातून काढलं तर आपला इतिहास कुठे जातो? आणि इतिहासात त्यांचा समावेश केला तर इतिहास कुठे जातो ? हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. इस्लामी राजवटींना छत्रपती शिवरायांनी रोखलं होतं हे जर कळलं तरच आपल्याला शिवचरित्र कळलं असं म्हणता येईल असंही मेहेंदळेंनी म्हटलं होतं.