Raj Thackeray News: “पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या सहा अतिरेक्यांना मारण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नव्हे. आता जे काही झालं, त्याला युद्ध म्हणू शकत नाही. देशाच्या समोर ज्या गोष्टी आल्या, त्याला तुम्ही काय म्हणणार? आपण आपलं काय करून घेतलं? मी आधीही हेच विधान केलं, तेव्हा मी युद्धाच्या विरोधात आहे, असं म्हटलं गेलं. या देशाने युद्ध कधी पाहिलेलं नाही. एकदा गाझापट्टीची अवस्था पाहून घ्या. दिवाळीत फटाके वाजले म्हणून तक्रार करणारी लोकं आपल्याकडे आहेत”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात निर्माण झालेल्या तणावावर भाष्य केले. मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी विविध विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.
सिनेदिग्दर्शक केदार शिंदे आणि मुंबई तकचे पत्रकार यांनी संयुक्तपणे घेतलेल्या या मुलाखतीमध्ये केदार शिंदे यांनी प्रश्न विचारला की, संपूर्ण जग उजवीकडे जात असताना तुम्ही एकटेच डावीकडे कसे जाता? यावर राज ठाकरे म्हणाले की, मला सत्य दिसतं. पहलगामवरील हल्ल्यानंतर मी हेच म्हणालो होतो.
भारतीय लष्कर पाकिस्तानला प्रत्युत्तर देत असताना वृत्तवाहिन्यावर दाखविण्यात आलेल्या बातम्यांवरही राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, इस्लामाबाद हातात आला. कराची ताब्यात घेतलं. अशा बातम्या सुरू होत्या. इस्लामाबाद हातात घेऊन त्याचं काय करायचं. इथली भिवंडी, मालेगाव हाताळता येत नाही. अन् इस्लामाबाद घेऊन काय करणार? असा उपरोधिक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
मी देशाच्या विरोधात बोललोच नाही
“पहलगामवरील हल्ला झाल्यानंतर मी जी काही प्रतिक्रिया दिली, त्यावरून मी देशाच्या विरोधात बोललो, अशी टीका काहींनी केली. पण माझं विधान पुन्हा ऐका. मी तसं काही बोललो नव्हतो. आज अनेकजण बोलत आहेत, की मी बरोबर बोललो”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार या राजकीय घराण्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे यात काही वादच नाही. पण तो ब्रँड संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता. संगीत क्षेत्राचा विचार केला तर माझे वडील म्हणजेच श्रीकांत ठाकरेंचा प्रभाव दिसून आला. त्यानंतर माझा प्रभाव आहे, उद्धवचा आहे. व्यक्तिगत प्रभाव असतो पण आडनाव महत्त्वाचं असतंच. ती गोष्ट म्हणजेच आडनाव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”