Raj Thackeray : पहलगाम या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर भारताने ६ मेच्या रात्री एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला उत्तर दिलं. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. त्यातली राज ठाकरेंची प्रतिक्रिया ही चर्चेत राहिली होती. मात्र यावरुन आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंचं ते वक्तव्य आल्याने माझ्यास सगळेच मनसे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

पहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी जे पहिले ट्विट केले त्यामध्ये सांगितले होते की, ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला पाहिजे जो त्यांच्या पुढील पिढ्यांनाही लक्षात राहिल. पण, दहशतवादी हल्ल्याला उत्तर उद्ध नसतं. दहशतवाद्यांनी अमेरिकेत ट्वीन टॉवर्स पाडले म्हणून त्यांनी युद्ध नाही केले. त्यांनी दहशतवादी ठार मारले. मुळात ही गोष्ट का घडली हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपण थोडासा आपला विचार करणेही गरजेचे आहे. पाकिस्तानला काय बरबाद करणार आहे, तो आधीच बरबाद झालेला देश आहे. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केले ते अजून सापडलेले नाहीत, ज्या पर्यटन स्थळावर हल्ला झाला तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.”

प्रकाश महाजन काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत जी भूमिका घेतली, त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे बुचकळ्यात पडले आहेत. “राज ठाकरे हे नेहमीच राष्ट्रावर प्रेम असलेल्या विचारसरणीचे नेते आहेत. मात्र अलिकडे त्यांनी युद्ध नको अशी भूमिका घेतली. ही भूमिका ऐकून त्यांच्यावर प्रेम करणारे समर्थक गोंधळले आणि काहींना तर यातून मानसिक दुःखही झालं मी देखील गोंधळून गेलो होतो. ते वक्तव्य त्यांनी का केलं हे मलाही अजून लक्षात आलं नाही. मी त्यांचा कार्यकर्ता आहे पण त्यांनी हे वक्तव्य का केलं याचा विचार मी करतो आहे. जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात त्यांना राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आनंद झाला.” असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलं आहे. प्रकाश महाजन यांच्या या वक्तव्यावर आता राज ठाकरे किंवा मनसेचे इतर नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सैन्य दलांच्या कारवाईचा सगळ्यांनाच अभिमान आहे-प्रकाश महाजन

राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्यावर मी विचार असा करत होतो की त्यांनी हे वक्तव्य का केलं असेल? त्यांच्या डोक्यात काय विचार असेल? त्यांचं म्हणणं हेच होतं की मोठ्या संख्येने पर्यटक होतं पण तिथे सुरक्षा नव्हती. ती असती तर दुर्घटना घडली नसती. पण लष्कराच्या कारवाईवर विश्वास नाही अशी काही राज ठाकरेंची भूमिका नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं की नाही याच्यवर चर्चा होऊ शकते. मात्र सैन्य दलांनी जी कारवाई केली आणि धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्या ती उत्तम कामगिरी आहे यात काही शंकाच नाही. असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.