Raj Thackeray : महाराष्ट्रात सध्या १५ ऑगस्टच्या मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मिष्किल वक्तव्य केलं आहे. प्रभादेवी येथील दहीकाला उत्सवासाठी राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणाचा स्वीकार करताना राज ठाकरे यांनी म्हटले की, “मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो.” त्यांच्या या वक्तव्यामुळे मांस विक्री बंदीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेत आणखी भर पडली आहे.

राज ठाकरेंचं वक्तव्य काय?

प्रभादेवी दही काला उत्सवाचं निमंत्रण द्यायला त्या मंडळाचे सदस्य गेले होते. तेव्हा राज ठाकरे म्हणाले, “हंडीचं आमंत्रण? मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो बरं का.” ज्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान महापालिकांनी १५ ऑगस्टला मांस विक्रीची भूमिका घेतली आहे त्यावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांचं राजकारणातलं टायमिंग जसं चांगलं आहे तशीच त्यांची विनोदबुद्धीही उत्तम आहे. अनेकदा भाषणांतही त्याचा प्रत्यय येतो.आज प्रभादेवी दही काला उत्सवाचं निमंत्रण द्यायला आलेल्या मंडळाच्या सदस्यांनीही हा अनुभव घेतला.

स्वातंत्र्य दिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका-राज ठाकरे

१५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयावर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे असं राज ठाकरे म्हणाले.

कुणी काय खायचं आणि काय नाही ते महापालिकेने ठरवू नये-राज ठाकरे

राज ठाकरे यांना यासंबंधीचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, “आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या गोष्टीचे अधिकार नाहीत. कुणी काय खावे आणि कुणी काय खाऊ नये? हे ठरविण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत.” एका बाजूला स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना खायचे स्वातंत्र्य नाही?, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कशावर तरी बंदी आणणे हाच मोठा विरोधाभास आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या दोन दिवशी तुम्ही बंदी कशी काय आणू शकता? कुणाचा काय धर्म, कुणाचे काय सण आहेत? यानुसार कुणी काय खावे, हे सरकारने सांगण्याची गरज नाही.” असं राज ठाकरे म्हणाले. मात्र त्यानंतर जेव्हा दही हंडी मंडळाचे लोक त्यांच्याकडे निमंत्रण घेऊन गेले तेव्हा मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो असं राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.